बदलापूर प्रकरणावरुन माझा राजीनामा मागताय, पण..... देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल
कोल्हापूर : बदलापूर पूर्वेकडील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराच्या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करत लोक रस्त्यावर उतरले आणि जोरदार आंदोलन केले. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांची दिरंगाई, तसेच महिला सुरक्षा, तसेच कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधकांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीमान्याची मागणी केली आहे. यावर फडणवीस यांनी विरोधकांना फटकारले आहे.
कोल्हापूरच्या तपोवन मैदानात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' लाभार्थी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीस म्हणाले, आम्ही आता ठरवलं आहे की अशा प्रकारच्या घटनांमधील आरोपींना सोडणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. गुन्हेगारांना फाशीपर्यंतची शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न करू.

फडणवीस विराधकांवर पलटवार करत म्हणाले की, मला एक गोष्ट सांगायची आहे मुलगी कोणतीही असो ती आपलीच असते. कोलकात्यामध्ये एका डॉक्टर तरुणीवर भयानक अत्याचार झाले, अत्याचार करून तिचा खून करण्यात आला मात्र महाविकास आघाडीतील लोकांनी त्या प्रकरणावर बोलण्यासाठी तोंडं उघडली नाहीत. कोलकत्यातील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतरही हे लोक ममता बॅनर्जी यांचं कौतुक करत राहिले. त्यांनी एका शब्दाने त्या घटनेचा निषेध नोंदवला नाही.
महाराष्ट्रात अशीच घटना घडल्यावर मात्र हेच लोक सरकारने राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी करु लागले आहेत. अशा प्रकरणांमधील नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. काहीही झालं तरी चालेल या नराधमांना समाप्त केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. ही गोष्ट विरोधकांना ठणकावून सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. त्यांना राजकारण करू द्या. कारण ते संवेदनाहीन आहेत असंही फडणवीस म्हणाले.
फडणवीसांनी राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण
काॅंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications