सावधान..डेंग्यूने डोके वर काढले! अमरावतीत आढळले डेंग्यूचे 27 रुग्ण; नाशिकमध्येही प्रकोप
पावसाला सुरु होताच सर्वत्र साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. राज्याच्या सर्वच भागात कमी अधिक फरकाने हीच स्थिती आहे.
विशेषतः पश्चिम विदर्भातील अमरावती येथे डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. डेंग्यूचे २७ रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. अमरावती प्रमाणेच नाशिकच्या शहरी भागात देखील डेंग्यूचा प्रकोप पाहायला मिळत आहे.

साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती
राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचून डासाची उत्पत्ती होते. त्यामुळे अडगळीच्या ठिकाणी पाणी साठणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. आठवड्यातून एक दिवस नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा. तसे केल्यास डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या डासांची उत्पत्ती होणार नाही. नागरिकांनी शरीर पूर्ण झाकेल असे कपडे वापरावे तसेच नेटचा वापर करावा.
आजूबाजूच्या परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य क्षेत्रातील तज्ञांनी केलं आहे.
डेंग्यूची लक्षणे
- प्रचंड अशक्तपणा येऊन भोवळ येणे
- डोळे आणि डोके दुखी
- तोंडाला कोरड पडणे
- त्वचेवर लाल व्रण उठणे
- तळहात आणि तळपायांना खाज येणे
- उलट्या होणे
- भूक कमी लागणे किंवा मळमळणे
- अधिक तीव्रतेचा ताप
- अंगदुखी आणि अशक्तपणा
- हिरड्यांमधून अथवा नाकातून रक्तस्त्राव होणे
हे करा उपाय
घरांच्या अवती-भवती अथवा टेरेस वर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, टायर यासारख्या वस्तूंमध्ये पावसाचं पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होतात. अशी ठिकाणे नष्ट करावीत. खिडक्यांना जाळ्या बसवून (स्क्रीनिंग करून) घरात किंवा कार्यस्थळी डासांच्या शिरकाव होण्यास प्रतिबंध करावा. आपल्याला डास चावणार नाहीत यासाठी सर्वतोपरी बंदोबस्त करावा. आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे सूचित करण्यात आले आहे.
नाशिकमध्येही डेंग्यूचा प्रकोप
अमरावतीप्रमाणेच नाशिकमध्येही डेंग्यूच्या फैलावाचे तांडव सुरु आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात दोनशेहून अधिक डेंग्यू बाधित रुग्ण शहरात आढळून आले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सध्या शहरात सर्वत्र डेंगूचे रुग्ण वाढत असून महापालिकेची यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे.
विविध भागात पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर्सकडून तपासणी करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांनीही योग्यती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डेंग्यूचा वाढता धोका पाहता सहाही विभागात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. डेंग्यू बरोबरच शहरात चिकुनगुनियाची साथ देखील सुरु झाली आहे.












Click it and Unblock the Notifications