लाडक्या बहिणींसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा! यवतमाळात म्हणाले- उशीरा फार्म आला तरी पैसे मिळणार
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी कुणाचा फार्म उशीरा आला तरी चिंता करु नका. ३१ ऑगस्टपर्यंतच्या सर्व फार्मधारकांना जुलै ते सप्टेंबर महिन्यांचे पैसे येणार आहेत. त्यामुळे महिलांनो चिंता करु नका, सप्टेंबरमध्ये जरी फार्म भरला तरीही पैसे येतील. शेवटचा फार्म येईपर्यंत आम्ही थांबणार नाही." असं स्पष्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना निश्चिंत केलं.
महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रसार प्रचार कार्यक्रमात आज ते यवतमाळ इथं बोलत होते.

आमच्या बहिणी भावजींना म्हणतात...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या महायुती सरकारने महिला सक्षमीकरणासाठी योजना सुरु केल्या. लेक लाडकी योजना आणली. महिलांना एसटी प्रवास अर्ध्या तिकीटात करण्यात आला. रोज वीस लाख महिला प्रवास करत आहेत. ही या योजनेची उपलब्धी आहे. यामुळे तोट्यातील एसटी फायद्यात आली. आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात की, तुम्ही तालुक्याला गेले की, दुप्पट पैसे खर्च होतात पण आम्ही गेलो तर निम्मे पैसे लागतात.
नादान लोकांना बहिणींचे प्रेम काय कळणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेगवेगळ्या योजनांद्वारे महिलांचे सक्षमीकरण आपण सुरु केलं आहे. बचतगटांना पैसे सरकार देतात. लाडकी बहिण योजना ही आपली महत्वकांक्षी योजना आहे. ही योजना सुरु केल्यानंतर विरोधी पक्षांनी आमच्यावर खूप टीका केली. कुणी फसवी योजना म्हणाले, कुणी विकत घेता का, लाच देतात का असं म्हटलं पण त्या नादान लोकांना बहिणींचं प्रेम काय असतं हे माहीत नाही.
इश्वर जरी अवतरला तरी...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, इश्वर जरी अवतरला आणि त्यानं बहिणींचं प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याला विकत घेता येत नाही. हे अनमोल प्रेम कुणीच विकत घेऊ शकत नाही. आमच्या बहिणींचं निखळ प्रेम मिळतंय. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करत आहोत. विरोधक म्हणत होते की, दहा टक्के बहिणींनाही पैसे मिळणार नाही तर दीड कोटी बहिणींना त्यांच्या खात्यात थेट पैसा दिला जात आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुणाचा फार्म उशीरा आला तरी चिंता करु नका. ३१ ऑगस्टपर्यंतच्या सर्व फार्मधारकांना जुलै ते सप्टेंबर महिन्यांचे पैसे येणार आहेत. त्यामुळे महिलांनो चिंता करु नका, सप्टेंबरमध्ये जरी फार्म भरला तरीही पैसे येतील. शेवटचा फार्म येईपर्यंत आम्ही थांबणार नाही असं स्पष्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना निश्चिंत केलं.












Click it and Unblock the Notifications