Dahihadi: मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीची धूम; विक्रमाचा आनंद तर अपघाताचे सावट, 1 मृत्यू, शेकडो जखमी
Dahihadi Utsav, Mumbai News : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. उंचच उंच मानवी मनोरे रचत गोविंदा पथकांनी विक्रमांचे इमले चढवले, पण याच जल्लोषादरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने उत्सवावर शोककळा पसरली आहे. एका बाजूला गोविंदांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमत होता, तर दुसऱ्या बाजूला एका गोविंदाच्या मृत्यूने सर्वांनाच हळहळ वाटली.
विक्रमी मनोऱ्यांचा जल्लोष
यावर्षीच्या दहीहंडी उत्सवामध्ये राजकीय नेते, कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे सहभागी झाल्याने उत्साह वाढला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते दहीहंडीच्या कार्यक्रमांना उपस्थित होते.
नृत्यांगणा गौतमी पाटीलचा जलवा देखील विविध ठिकाणी पाहायला मिळाला. मुंबईतील अनेक गोविंदा पथकांनी नवनवीन विक्रम रचले. जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल 10 थरांचा विश्वविक्रमी मनोरा रचून सर्वांचे लक्ष वेधले.

मानखुर्दमध्ये गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू
एकीकडे विक्रमांची नोंद होत असताना, दुसरीकडे मुंबईच्या मानखुर्दमध्ये दहीहंडीला गालबोट लागले. येथील बाल गोविंदा पथकातील ३२ वर्षीय गोविंदा जगमोहन शिवकुमार चौधरी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दहीहंडीसाठी दोरी बांधत असताना तोल गेल्याने तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण बाल गोविंदा पथकावर आणि दहीहंडी उत्सवाच्या उत्साहावर शोककळा पसरली आहे.
संकल्प नवी उंची गाठण्याचा....
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 16, 2025
🪈Celebrated 'DahiHandi Utsav 2025' with enthusiastic Govindas organised by Sankalp Pratishthan at Sankalp Chowk, Thane.
🪈 संकल्प प्रतिष्ठानतर्फे संकल्प चौक, ठाणे येथे आयोजित 'दहीहंडी उत्सव 2025' गोविंदांसह मोठ्या उत्साहात साजरा केला.
🪈 संकल्प… pic.twitter.com/fbp2lVJjaE
३२ गोविंदा जखमी, १५ रुग्णालयात
या उत्सवामध्ये मानखुर्द येथील मृत्यूच्या घटनेसह मुंबईत सकाळपासून एकूण ३२ गोविंदा जखमी झाले आहेत. यापैकी १५ गोविंदांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे, तर उर्वरित १५ गोविंदांवर अजूनही वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जगमोहन शिवकुमार चौधरी यांच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, या घटनेमुळे दहीहंडी उत्सवाच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लावलेल्या एका मराठी गीताची जोरदार चर्चा सुरू आहे. मनसेने यंदा 'मराठी सणांसाठी, मराठी मनांसाठी' हे ब्रीदवाक्य घेऊन या दहीहंडीचे आयोजन केले होते. याच व्यासपीठावर आव्हाड यांनी उपस्थित राहत, मराठी अस्मितेचा जयघोष केला.
आव्हाडांचे कौतुक आणि 'लाव रे डीजे'ची हाक
कार्यक्रमात आव्हाड यांचे स्वागत करताना मनसेचे नेते अविनाश पानसे यांनी त्यांचे कौतुक केले. आनंद दिघे यांनी या सणाला मोठे स्वरूप दिले आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी हा सण जगभर पोहोचवला. स्पेनची टीम मुंबईत आणून त्यांनी या सणाचे महत्त्व वाढवले, असे पानसे म्हणाले.
त्यानंतर माईक हातात घेताच जितेंद्र आव्हाड यांनी डीजेला थेट 'लाव रे जय जय महाराष्ट्र' अशी हाक दिली. त्यांनी उपस्थितांना दोन्ही हात वर करून हे महाराष्ट्राचे गीत आहे, मराठी माणसाचे गीत आहे, असे सांगत सर्वांना या गीतावर साथ देण्याचे आवाहन केले.
'तुमचं आमचं नातं काय?'
जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः जय जय महाराष्ट्र हे राज्यगीत गायले. यावेळी त्यांनी "एकही हात खाली असता कामा नये, मराठी माणसाची ताकद दाखवा" असे आवाहन केले. त्यांनी उत्स्फूर्तपणे घोषणा देत उपस्थितांमध्ये जोश भरला. "तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय!" या घोषणेने त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली आणि मनसेच्या व्यासपीठावरून मराठी अस्मितेचा एक वेगळा संदेश दिला.












Click it and Unblock the Notifications