औरंगजेब आणि फडणवीस एकसारखेच; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याच्या आरोपाने उडाली खळबळ
औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या चांगलंच वातावरण तापलं आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेब यांची तुलना केली. दोघंही एकसारखेच शासक असून त्यांचा कारभार देखील एकसारखाच आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. यावरुन आता चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे.

फडणवीसांवर जहरी टिका
पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी औरंगजेब व फडणवीसांचा कारभार एकसारखा असल्याची टीका केली. ते म्हणाले, औरंगजेब हा क्रूर होता. त्याने स्वत:च्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. स्वत:च्या मोठ्या भावाचा खून केला. लहान भावाला पागल करार दिला. त्यालाही मारून टाकलं. औरंगजेब कधी हजला गेला नाही, मात्र कायम धर्माचा आधार घेत राहिला. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर शासक आहेत. तेही कायम धर्माचा आधार घेत आहेत. फडणवीसांच्या काळात आज महाराष्ट्र सुरक्षित राहिलेला नाही, अशी टिका सपकाळ यांनी केली.
कबरीबाबत काय म्हणाले?
औरंगजेबाच्या कबरीवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी औरंगजेबाला आव्हान दिलं. मराठी माणूस औरंगजेबाला कधीही घाबरला नाही. शिवाजी महाराजांचं शौर्य आम्हाला प्रमाण आहे. या शौर्याचं प्रमाण अन् औरंगजेबाला कसं गाडलं याचा इतिहास आहे. तेच या कबरीच्या मातीत, महाराष्ट्राच्या मातीत आहे. जेव्हा औरंगजेबाची कबर उचलून टाका, असं सांगतात. याचा अर्थ काय तर त्यांना मराठी माणसाचा, मावळ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे. क्रूर वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो, हे त्या ठिकाणी चिन्हीत होतं. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, असं देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
कबर शौर्याचं प्रतिक
औरंगजेबाच्या कबरीबाबत सपकाळ यांनी हा मराठ्यांच्या शौर्याचं प्रतिक असल्याचं सांगितलं. कबर उखडून टाका म्हणणारे मराठ्यांचा इतिहास पुसून टाकायला निघाले आहेत, अशी टिका सपकाळ यांनी केली. सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची तुलना थेट औरंगजेबाशी केल्याने आता वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications