बीडमधून कलेक्टर गायब झालाय, त्याचा शोध लागलाच नाही; जितेंद्र आव्हाडांचा स्टेटमेंट बाँम्ब
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेक नेत्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. बीडमधील बंदुकशाही, खंडणी, दहशत, गुन्हेगारी यांच्यावर अनेकांनी आसूड ओढला. वाल्मिक कराड हाच या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे, असा आरोप अनेकांनी केल्या. मात्र या सगळ्यात शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या स्टेटमेंट बाँम्बची चांगलीच चर्चा रंगली. बीडमधून एक कलेक्टर गायब झालाय व तो पुन्हा कुणालाच दिसला नाही, असा गौप्यस्फोट आव्हाडांनी केला. आता हा कलेक्टर कोण, याच्या चर्चा रंगल्या आहेत.

काय म्हणाले आव्हाड?
मोर्चासमोर भाषण करताना आव्हाडांनी अनेक धक्के दिले. ते म्हणाले, पोंक्षे या अधिकाऱ्याने एक मुलाखत दिली होती. त्या अधिकाऱ्याचे म्हणणे होते, बीडमध्ये दर दोन दिवसाला मारामाऱ्या व्हायच्या. बीडमधून एका कलेक्टरची बदली झाली. मात्र त्यानंतर तो कलेक्टर कोठेच दिसला नाही. त्याचं काय झालं, कुणालाच माहित नाही. पोंक्षे नावाच्या अधिकाऱ्याची चौकशी केली, तर हे प्रकरण समोर येईल. कलेक्टर गायब होतो, म्हणजे काय? असा सवाल करत आव्हाडांनी एकच गौप्यस्फोट केला.
सरकारवर ओढले ताशेरे
आव्हाड पुढे म्हणाले, मी सांगतोय पण चौकशी होईल का, हा खरा प्रश्न आहे. उद्या मुंबईत बसून धनुभाऊने फोन केला तर हा अधिकारी माहिती द्यायला जाईल का..? मंत्रिमंडळात राहून हा डोळे दाखवणार. डोळे दाखवले की अधिकारी घाबरणार. त्यांनी डोळ्याने इशारा केला की, चौकशी थांबणार... असंच करायचं असेल, तर सरकारने संतोष देशमुख मर्डर केसची चौकशीच करु नये. देशमुखांच्या कुटुंबाचा व आमचाही अपेक्षाभंग करु नका, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
सगळेच वंजारी
आव्हाड पुढे म्हणाले की, सुरेश धस यांनी ज्यांचे मर्डर झालेत त्यांची नावे घेतलीत. ते सर्व वंजारी समाजाचे होते. म्हणजे मेलेलेही वंजारी आणि मारणारेही वंजारीच... संतोष देशमुख कुणासाठी गेला होता? ते एका दलित समाजाच्या मुलाचा जाब विचारायला गेले होते. तरी त्यांची हत्या झाली. ही दहशत एका जातीची नाही, तर एका प्रवृत्तीची आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना एक होऊन या प्रवृत्तीला गाडावे लागणार आहे, असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications