विलीनीकरण करायचे असेल तर भाजपला विचारावेच लागेल!; भुजबळांचे राष्ट्रवादीच्या भविष्याबाबत मोठे विधान
Chhagan Bhujbal on NCP BJP Alliance : राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेण्यासाठी जनसागर लोटत असतानाच, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) भवितव्याबाबत आणि दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना अत्यंत परखड आणि महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.

विलीनीकरणाचा निर्णय भाजपशिवाय अशक्य
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना भुजबळ यांनी सत्तेचे समीकरण स्पष्ट केले. ते म्हणाले की, "आम्ही सध्या महायुतीचे घटक आहोत. जर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत काही निर्णय घ्यायचा असेल, तर तो आम्हाला भाजपला विचारल्याशिवाय घेता येणार नाही. कोणाला सोबत घ्यायचे आणि कोणाला नाही, याबाबत भाजपच्या ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करणे अनिवार्य आहे."
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावीच लागेल
भुजबळ यांनी पुढे स्पष्ट केले की, ज्यांच्यासोबत आपण सरकारमध्ये आहोत, त्यांना अंधारात ठेवून कोणताही निर्णय घेता येणार नाही. "आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतृत्वाचा सल्ला घेणे ही राजकीय शिष्टाचाराची गोष्ट आहे. विलीनीकरणाबाबत माझ्याकडे कोणतीही कल्पना नाही किंवा तशी कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही," असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
"ठाकरे बंधूंसारखे पवार एकत्र यावे ही इच्छा, पण..."
राजकारणात अलीकडेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ म्हणाले की, "जसे दोन्ही ठाकरे एकत्र आले, तसे दोन्ही पवार एकत्र यावे ही भावना असू शकते. मात्र, अजितदादांनी असा कोणताही विचार केल्याचे आम्हाला वाटत नाही. दादांनी भाजपसोबत राहूनच काम करण्याचे ठरवले होते. जर सरकारमधून बाहेर पडायचे असेल किंवा एनडीए (NDA) सोडायची असेल तर गोष्टी वेगळ्या असतात, पण दादांच्या मनात तसे काही नव्हते."
अजितदादांनंतर आता नेतृत्व कोणाचे?
अजित पवारांच्या पश्चात पक्षाच्या नेतृत्वाबाबत बोलताना भुजबळ यांनी काही महत्त्वाचे संकेत दिले, भुजबळ यांनी सुचवले की, आगामी काळातील राजकीय निर्णयांबाबत सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. "आम्ही उपमुख्यमंत्र्यांची निवड केली आहे, आता त्यांच्या नेतृत्वात चर्चा होतील. राजकारणात काही गोष्टी लगेच घडतात, तर काही गोष्टींना वेळ लागतो," असे म्हणत त्यांनी घाई करण्याची गरज नसल्याचे सांगितले.












Click it and Unblock the Notifications