पक्षात अजित पवारांच्या शब्दाला किंमत नाही, पाहा कुणी केला 'हा' मोठा आरोप
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेश सरचिटणीसपदी नेमण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या छावा संघटनेने अजित पवार यांच्या शब्दाला पक्षात किंमत नसल्याचा आरोप करत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

नेमके प्रकरण काय?
काही महिन्यांपूर्वी, पावसाळी अधिवेशनादरम्यान तत्कालीन कृषिमंत्र्यांच्या विरोधात छावा संघटनेने आंदोलन केले होते. लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्या एका कार्यक्रमात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यासमोर पत्ते फेकले होते. त्यावेळी, उपस्थित असलेले सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयकुमार घाडगे यांना मारहाण केली होती. या घटनेनंतर अजित पवार यांनी स्वतः हस्तक्षेप करत सूरज चव्हाण यांची राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती.
छावा संघटनेचा पवारांच्या भूमिकेवर आक्षेप
अवघ्या एका महिन्यातच सूरज चव्हाण यांना पुन्हा पक्षात महत्त्वाचे पद दिल्याने छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "ज्याला मारहाण केल्याबद्दल अजित पवारांनी स्वतः हकालपट्टी केली, त्याच व्यक्तीला आता पुन्हा प्रमोशन का दिले जात आहे? अजित पवारांच्या भूमिकेला डावलून सुनील तटकरे यांनीच हे राजकीय पुनर्वसन केले आहे का?" असा सवाल विजय घाडगे यांनी उपस्थित केला आहे.
"या निर्णयामुळे अजित पवारांच्या शब्दाला पक्षातच किंमत नसल्याचे सिद्ध झाले आहे," असेही ते म्हणाले. आगामी काळात सुनील तटकरे यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या घडामोडींमुळे अजित पवार गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.












Click it and Unblock the Notifications