मराठा समाजाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे, भाजपच्या 'या' नेत्याचा गंभीर आरोप
पुणे - मराठा समाज आर्थिक आणि मागास आणि आर्थिक दुर्बल आहे, हा मुद्दा उद्धव ठाकरेंच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडला नाही. त्यांच्या सरकारने चार चांगले उच्चस्तरीय वकील तेव्हा दिले असते, तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्याच दिवशी संपला असता, त्यामुळे मराठा समाजाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे हे आहेत असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
..तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे होते
पुणे येथे भाजपचे राज्य अधिवेशन सुरु आहे, या अधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बावनकुळे यांनी टीका केली. मराठा समाजाला आरक्षण दिले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. तत्पूर्वी आरक्षणाचा कायदा विधीमंडळात, उच्च न्यायालयात मंजूर झाला पण जेव्हा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर केस सुरु होती, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे होते.

दोनशेपेक्षा जास्त जागा मिळणार
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झालेल्या सर्व जागांवर मतांची संख्या खूपच कमी आहे. प्रत्येक बूथवर आठ-दहा जास्त मते मिळाली असती तर पक्षाला एकोणीस जागा मिळाल्या असत्या आणि महायुतीला पंचवीसपेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या. पुढील विधानसभा निवडणुकीत पक्षाचा झेंडा दोनशेहून अधिक जागांवर फडकणार आहोत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, दोनशे पार जाण्यासाठी पुढचे चार महिने नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांना समर्पित भावनेने काम करावे लागेल. अटलजी म्हणाले होते की एकतर आम्ही जिंकू किंवा शिकू. या निवडणुकीत, आम्ही इंडी आघाडी आणि त्यांचे खोटेपणावर आधारित रणनीती पाहिली आहे.
भाजपचेच सरकार येणे आवश्यक
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 2013 मध्ये असेच अधिवेशन झाले होते त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री झाले. ते म्हणाले की, फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या हितासाठी आणि समृद्धीसाठी जलयुक्त शिवारसारख्या एकूण अठरा योजना सुरू केल्या होत्या, त्या उद्धव ठाकरेंनी बंद केल्या. सध्याच्या सरकारने सुरू केलेल्या योजनांची अंमलबजावणी करायची असेल तर राज्यात पुढचे सरकारही भाजपचेच होणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
पुण्यात भाजपचे अधिवेशन
पुण्यात आज भारतीय जनता पक्षाच्या राज्य अधिवेशनात दिग्गज नेते एकत्र आले आहेत.. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून ते अश्विनी वैष्णव, पीयूष गोयल, नितीन गडकरी, भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्यातील सर्व ज्येष्ठ नेते येत आहेत. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये भाजप नेते संबोधित करीत आहेत.
आज अधिवेशनात ठरणात रणनिती
लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा व रणनीती याबाबत या अधिवेशनात महत्त्वाचे निर्णय होणे अपेक्षित आहे. पक्ष आपल्या घटकांसह विधानसभा निवडणूक लढवणार की एकट्याने जाण्याचा मार्ग निवडणार यावर एकमत होण्यासाठी सध्या विचारमंथन सुरू आहे. जनसंवाद यात्रेची रूपरेषा पक्षाकडून तयार करण्यात आली असून ती अधिक धारदार करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.












Click it and Unblock the Notifications