भाजपकडून कुणा-कुणाला तिकीट बावनकुळे यांनी सांगितले, भाजपमध्येही कुणाचं तिकीट पक्कं.. वाचा
Chandrasekhar Bawankule :विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले. त्यात आपल्या तिकीट मिळावे, यासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली. या निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत.
आपल्यालाच तिकीट मिळाले, असा दावा करीत काहीजण प्रचारालाही लागले आहेत. पण, अजून महायुतीत कुणाच्या वाट्याला किती जागा येणार, त्यात कुणाला कोणत्या जागा मिळणार, हे अजून स्पष्ट नाही. त्यामुळे आपले तिकीट पक्के आहे, असा दावा करणाऱ्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका विधानामुळे ब्रेक लागला. बावनकुळे यांनी नेमकं काय विधान केले, त्याची ही बातमी...

काय म्हणाले बावनकुळे?
भाजपमध्ये अजून तरी कोणाचीही उमेदवारी कन्फर्म झालेली नाही. कुणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी बैठकीत घेतील, असं बावनकुळे यांनी म्हटलंय. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय. वर्धा जिल्ह्यातील आर्वी व धामणगाव या दोन विधानसभा क्षेत्रांचा आढावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. वर्धेत आले असता त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांना कडक शब्दांत इशारा दिला.
प्रत्येक बुथवर मतांची संख्या वाढवा
लोकसभा निवडणुकीमध्ये अपयश आले. त्यामुळे प्रत्येक बुथवर मतांची संख्या कशी वाढेल यादृष्टीने प्रयत्न करावा. त्याचदृष्टीने विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता प्रत्येक बुथवर जाऊन मतं वाढण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी बैठकीत दिला. आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार केचे व फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे असे दोन प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या आढावा बैठकीनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर कुणाला उमेदवारी मिळेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
बैठकींपेक्षा प्रत्यक्ष कामावर भर द्या
प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाऊन पोहोचत काम करण्यापेक्षा पक्षातर्फे बैठकाच अधिक होत आहेत. त्यामुळे त्यातच जास्त वेळ जातो आहे. या बैठका कमी करून प्रत्यक्ष काम करण्यास कार्यकर्त्यांनी वेळ द्यावा. असंही मत यावेळी बावनकुळे यांच्यासमोर काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं.
भाजपपुढे मोठं आव्हान!
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार उद्धव यांची साथ सोडून बाहेर पडले. भाजपने त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर सरकार व्यवस्थित सुरू असताना भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतले. लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून बरेच मतभेद होते. त्याचा फटकाही महायुतीला बसला. आता विधानसभा निवडणुकीत जागावाटप करताना, उमेदवारी देताना याच आव्हानांचा सामना भाजपला करावा लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications