उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही - बावनकुळेंची खोचक टीका! नेमकं काय घडलं वाचा
Chandrasekhar Bawankule Criticizes Uddhav Thackeray : अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री'त बसून उबाठा पक्षाचा वचननामा प्रकाशित केला. बाळासाहेबांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं तर उद्धव ठाकरे फक्त कुटुंबाचं हितं जोपासतात. ते नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो असे म्हणत त्यांना घरात बसूनच कारभार करायची सवय असल्याची खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आज लगावला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून आज उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

काय आहे बावनकुळे यांचे ट्विट
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज 'मातोश्री'त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात काय?
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधानसभेच्या दृष्टीने आज हा जाहीरनमा प्रसिद्ध करण्यात आला. आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वचननाम्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी अनिल परब, सुभाष देसाई यांच्यासह अन्य नेतेही उपस्थित होते. लवकरच महाविकास आघाडीचा जाहीरनामाही येणार आहे. मात्र आम्ही आपल्याला काही महत्त्वाचे वचने देऊ इच्छितो, यासाठी हा जाहीरनामा असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
- महाविकास आघाडीचे सरकार आल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द केला जाईल.
- कोळीवाड्याचा क्लस्टर जीआर रद्द करणार
- राज्यातील बेरोजगारी हटवून भुमिपूत्रांना नोकऱ्या देणार.
- मुलांना मोफत शिक्षण देणार, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार, अशी आश्वासनेही देण्यात आली आहेत.
नोकरीला प्राधान्य
या जाहीरनाम्यात मुलांना मोफत शिक्षणाबरोबरच ठाकरे गटाने नोकरी, नोकरी आणि नोकरी ही आमची सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे असे स्पष्ट केले. मुलींना ज्या पद्धतीने मोफत शिक्षण दिले जाते, त्याच पद्धतीने मुलांनाही मोफत शिक्षण दिलं जाईल, असं ठाकरेंच्या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केले. शिक्षणानंतर मुलांच्या नोकरीसाठीही उबाठा कटीबद्ध आहे. असं जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आले.












Click it and Unblock the Notifications