खातेवाटप ठरलं..? फडणवीस, शिंदे, अजितदादांची महत्त्वाची बैठक, काही तासांत होणार जाहीर...
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतरही मंत्रीमंडळा स्थापनेस मुहूर्त लागलेला नव्हता. अखेर देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे व अजित पवारांनी राज्याचे कारभारी म्हणून शपथ घेतल्यानंतर मंत्रीमंडळ स्थापन झाले. आता आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने आज दुपारपर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

39 मंत्र्यांनी घेतली शपथ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. महायुतीच्या 39 मंत्र्यांनी त्यात शपथ घेतली. 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा त्यात समावेश होता. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर काही माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. आता पुढील काही तासात मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आज खातेवाटप जाहीर होणार
हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आजच महायुती सरकारचे खातेवाटप होणार असल्याचे बोललं जात आहे. पुढच्या काही तासात महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत तिढा निर्माण झालेले गृहखातं अखेर भाजपला मिळणार असल्याचे बोललं जात आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये गृहखात्यावरुन मोठा वाद झाला होता. मात्र अखेर भाजप स्वत:कडे गृहखाते ठेवण्यास यशस्वी झाली आहे. तसेच शिवसेनेकडे नगरविकास खाते दिले जाणार आहे.
महायुतीच्या नेत्यांची बैठक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी चहापानासाठी जाणार आहेत. यावेळी या तिघांमध्ये एक बैठक होईल. या बैठकीत हे तिघेही खातेवाटपावर चर्चा करतील. या चर्चेनंतर खातेवाटपाबद्दल घोषणा केली जाईल, असे म्हटले जात आहे. महायुती सरकारमध्ये खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यानुसार भाजपकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा ही चार खाती असणार आहेत. तर शिवसेनेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं असेल. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीकडे अर्थ खातं आणि उत्पादन शुल्क खातं असेल, अशी माहिती समोर येत आहे.












Click it and Unblock the Notifications