BMC Election 2026: निवडणूक आयोगाचे नवे 'पाडू' मशीन अन् 'घरोघरी'..;मतदानापूर्वी राज ठाकरेंचा हल्लाबोल
Raj Thackeray Attacks EC Over PADU Machine : मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत मतदानाच्या अवघ्या २४ तास आधी राजकारण कमालीचे तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि नव्याने आणलेल्या 'PADU' (पाडू) मशीनवर गंभीर प्रश्न उपस्थित करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
विशेष म्हणजे, या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी 'शिवतीर्थ'वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली, ज्यामुळे मुंबईच्या राजकारणात 'ठाकरे बंधू' विरुद्ध 'प्रशासन' असा नवा संघर्ष पाहायला मिळत आहे.

प्रचाराचा कालावधी संपला तरी 'घरोघरी' भेटीची मुभा का?
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता जाहीर प्रचाराची तोफ थंडावली. मात्र, त्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा देणारी अधिसूचना आयोगाने काढली. यावर राज ठाकरेंनी कडक शब्दांत आक्षेप घेतला आहे.
राज ठाकरेंनी उपस्थित केले महत्त्वाचे प्रश्न?
"आतापर्यंतच्या निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी प्रचार न करण्याची प्रथा होती. यावेळी ही प्रथा का मोडली? पत्रके वाटता येणार नाहीत, पण भेटी घेता येतील याचा अर्थ पैसे वाटायला मुभा दिली आहे का?" असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. निवडणूक आयोग सरकारला हव्या त्या सुविधा पुरवण्यासाठी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
नेमकं काय आहे हे 'PADU' (पाडू) मशीन?
राज ठाकरेंनी उपस्थित केलेला दुसरा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे 'Printing Auxiliary Display Unit' (PADU) मशीन. या मशीनला त्यांनी 'पाडू' मशीन असे संबोधत संशय व्यक्त केला आहे.
काय आहे हे यंत्र?
हे मशीन ईव्हीएमच्या (EVM) 'कंट्रोल युनिट'ला जोडले जाते. जर ईव्हीएमचा डिस्प्ले तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला, तर या मशीनद्वारे मतमोजणीचा निकाल पाहता येतो किंवा प्रिंट करता येतो.
राज ठाकरेंचा आक्षेप
"ईव्हीएमला जोडल्या जाणाऱ्या या नवीन मशीनबद्दल राजकीय पक्षांना आधी माहिती का दिली नाही? यात गडबड होणार नाही याची खात्री काय? ही कोणती लोकशाही आहे?" असे प्रश्न विचारत त्यांनी याला 'बेबंदशाही' म्हटले आहे.
प्रशासनाचे स्पष्टीकरण
मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले आहे की, 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही. हे केवळ 'इमरजेंसी बॅकअप' म्हणून ठेवण्यात आले आहे. जर एखादे ईव्हीएम मशीन तांत्रिक कारणामुळे बंद पडले, तरच याचा वापर केला जाईल.
राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला विचारलेले ६ रोखठोक सवाल
१. काल ५ वाजता प्रचार संपल्यानंतर आज मतदारांच्या भेटी घेण्याची मुभा कशी दिली?
२. आतापर्यंतच्या निवडणुकांमधील प्रचाराची परंपरा यावेळीच का मोडली?
३. मतदानाच्या आदल्या दिवशीच्या भेटीबाबतची अधिसूचना आजच का काढली?
४. 'पाडू' (PADU) नावाचे नवे मशीन ईव्हीएमला का जोडले जात आहे?
५. या मशीनबद्दल राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन माहिती का दिली गेली नाही?
६. निवडणूक आयोग निष्पक्ष आहे की सरकारला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी काम करत आहे?
ठाकरे बंधूंचे शक्तीप्रदर्शन
उद्या, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. राज ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीनंतर दोन्ही नेते मुंबादेवीच्या दर्शनासाठी रवाना झाले. कार्यकर्त्यांना आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले की, "आपल्या विभागात लक्ष ठेवा, पैसे वाटप सुरू आहे आणि त्याला निवडणूक आयोग मदत करत असल्याचा आमचा संशय आहे."












Click it and Unblock the Notifications