मुंबईत भाजप- काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काँग्रेस कार्यालय फोडलं, पोलिसांचा लाठीहल्ला
राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप करत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. काँग्रेसनेच डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला म्हणत भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईतील काँग्रेसचे मुख्यालय फोडले. काँग्रेस मुख्यालयात जात खुर्च्या तोडण्यात आल्या. शाहीफेक करण्यात आली. दगडफेकही केली गेली. या जमावाला पांगवण्याकरता पोलिसांनी लाठीचार्जही केला.

भाजप कार्यकर्त्यांचा राडा
काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचं सांगत, भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत काँग्रेसंच कार्यालय फोडलं. कार्यालयात शिरुन भाजपच्या कार्यकर्त्यांनी अक्षरश: तोडफोड केली. पोस्टरवर शाईफेक केली आणि कार्यलायतल्या खुर्च्याही मोडल्या. यानंतर पोलिसांनीही, तोडफोड करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी या हल्लेखोर कार्यकर्त्यांना लाठीनं चांगलाच चोप दिला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अक्षरश: पळवू पळवू मारले.
विजय वडेट्टीवारांची टिका
या प्रकरणाचा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी निषेध केला. माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, "भाजपाचे कार्यकर्ते नसून भाजपाचे पोसलेले गुंड आहेत. आम्हीही आंदोलने केलीत, पण हातात दगडगोंडे घेतले नाहीत. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्याला विरोध म्हणून काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला होत असेल, खुर्च्या फोडल्या जात असतील आणि कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न असेल तर हे गंभीर आहे. राज्यात सरकारला शर्मेने मान खाली घालावी लागेल अशा दोन घटना घडल्या आहेत. यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढतेय. आता सत्ता आल्यानंतर कार्यकर्त्यांची हिंमत वाढतेय, असा आरोप वडेट्टीवारांनी केला.
वर्षा गायकवाडांचीही टिका
यावर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वाक्याला आमचा आक्षेप होता. आमची मागणी होती की त्यांनी माफी मागावी. मात्र आमच्या मुंबई कार्यालयावर जो हल्ला झाला तो भ्याड हल्ला आहे. त्याचा मी निषेध करते. राज्यामध्ये गृह खाते आहे का, कायदा सुव्यवस्था आहे का ? लाडकी बहिणी योजना काढायची आणि दलित बहिणीच्या ऑफिसची तोडफोड करायची हे चालतं का? राज्याला गृहमंत्री नाही , अर्थमंत्री नाही, तिघांच्या शपथविधीला करोडो रुपये खर्च केला. आज देशातल्या एकाच ऑफिसची तोडफोड झाली, ज्या ऑफिसची अध्यक्ष मी आहे , माझ्या फोटोवर त्यांनी काळी शाई फेकली , या सगळ्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications