दोन शून्यांची बेरीज शून्यच!: ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपचा डेटा स्ट्राईक;मुंबईतील मतांचे गणित कसे?
BJP on Thackeray brothers alliance : महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी एक मोठी घडामोड घडली. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ राजकीय व्यासपीठावर एकत्र आले. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 'मनसे' आणि 'ठाकरे गट' (शिवसेना उबाठा) यांच्या युतीची घोषणा वरळीतून करण्यात आली.
या युतीमुळे मुंबईतील मराठी मतांचे विभाजन थांबून भाजपला मोठा फटका बसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच, भारतीय जनता पक्षाने मात्र आकडेवारीनिशी या युतीवर जोरदार हल्ला चढवला आहे.

भावनिक महापूर की मतांचा दुष्काळ?
ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, भाजपने या उत्साहावर गणिताच्या आधारे विरजण घातले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या युतीचा समाचार घेताना म्हटले की, "दोन भावांच्या एकत्र येण्याचा जो भावनिक महापूर सध्या दिसतोय, तो ओसरल्यावर वास्तवातला मतांचा दुष्काळ समोर येईल." राजकारणात केवळ घोषणा किंवा भावना चालत नाहीत, तर आकडेवारी बोलते, असा टोलाही त्यांनी लगावला.
मनसे–उबाठा युती म्हणजे,
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 25, 2025
आषाढीच्या घरी महाशिवरात्र!
किंवा ग्रामीण म्हणीत सांगायचं तर—
उघड्याशेजारी दुसरा उघडं गेल,
रातभर थंडीने काकडून मेल…
दोन भावांच्या ‘एकत्र येण्याचा आनंद’ म्हणून जो भावनिक महापूर दाखवला जातोय, तो ओसरल्यानंतर वास्तवातला मतांचा दुष्काळ दिसणारच आहे.
कारण…
भाजपचा 'शून्य' सिद्धांत आणि ग्रामीण म्हणींचा आधार
केशव उपाध्ये यांनी या युतीचे वर्णन करताना ग्रामीण म्हणींचा खुबीने वापर केला. "मनसे-उबाठा युती म्हणजे आषाढीच्या घरी महाशिवरात्र!" किंवा "उघड्याशेजारी दुसरा उघडं गेलं, रातभर थंडीने काकडून मेलं..." अशा शब्दांत त्यांनी या युतीची खिल्ली उडवली. "दोन शून्यांची बेरीज ही नेहमी शून्याएवढीच असते," असे म्हणत भाजपने या युतीचा भाजपच्या विजयावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा केला आहे.
मतांचे नेमके समीकरण: भाजपचे गणित काय सांगते?
भाजपने मुंबईतील गेल्या काही निवडणुकांमधील आकडेवारी सादर करून आपले पारडे कसे जड आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
१. लोकसभा निवडणुकीतील स्थिती (मुंबई)
- लोकसभेत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील मतांची तुलना केली असता भाजप प्रणीत महायुती आघाडीवर असल्याचे दिसते:
- महायुती (भाजप + शिवसेना): २६,७४,२३३ मते
- महाविकास आघाडी (उबाठा + काँग्रेस): २४,६२,४०९ मते
२. विधानसभा २०२५ मधील आकडेवारी (मुंबई विश्लेषण)
- विधानसभेत जेव्हा मनसे स्वतंत्र लढली, तेव्हाची आकडेवारी भाजपसाठी अधिक आश्वासक आहे:
- महायुती (भाजप + शिवसेना): २९,००,०२० मते
- महाविकास आघाडी (उबाठा + काँग्रेस): २०,७७,८३५ मते
- मनसे: ४,१०,७३५ मते
युतीनंतरचे चित्र: भाजप का निर्धास्त आहे?
- भाजपच्या दाव्यानुसार, मुंबई महानगरपालिकेत सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नाही, फक्त मनसेची साथ आहे. जर आपण वरील आकडेवारीनुसार बेरीज केली तर:
- उबाठा (१३,९५,३०३) + मनसे (४,१०,७३५) = १८,०५,०३८ मते
- दुसरीकडे, एकट्या भाजपची मते १८,९०,९३१ इतकी आहेत. म्हणजेच ठाकरे बंधूंच्या युतीची एकत्रित मते ही भाजपच्या स्वतंत्र मतांपेक्षाही कमी भरत आहेत.
'अपूर्णांक' एकत्र येऊन 'पूर्णांक' होत नाहीत!
"दोन अपूर्णांक एकत्र आले म्हणून ते प्रत्येक वेळी पूर्णांक होतातच असे नाही," असे म्हणत केशव उपाध्ये यांनी या युतीचे राजकीय वजन कमी असल्याचे सूचित केले. राज ठाकरे यांनी मराठी मतदारांना एकसंध होण्याचे आवाहन केले असले, तरी आकडेवारी पाहता मुंबईत भाजप क्रमांक १ चा पक्ष राहिला आहे. आता ठाकरे बंधूंच्या या 'भावनिक युती'ला मुंबईकर मतदार मतांच्या स्वरूपात प्रतिसाद देतात की भाजपचे हे 'गणिताचे समीकरण' खरे ठरते, हे येणारा काळच ठरवेल.












Click it and Unblock the Notifications