मोठा वाद ! भाजप आमदाराचे धक्कादायक विधान; ‘मनोज जरांगे हे शरद पवारांचा सुसाइड बॉम्ब'
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान भाजप आमदार संजय केनेकर यांनी जरांगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. केनेकर म्हणाले की, "मनोज जरांगे हे शरद पवारांनी सोडलेला 'सुसाइड बॉम्ब' असून, ते देवेंद्र फडणवीस यांच्यावरील वैयक्तिक द्वेषापोटी समाजाचे नुकसान करत आहेत."

केनेकर यांनी दावा केला की, या सुसाइड बॉम्बचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावा लागेल. ते म्हणाले की, शरद पवार आपली भूमिका स्पष्टपणे मांडत नाहीत, त्याऐवजी ते अशा प्रकारच्या 'सुसाइड बॉम्ब'चा वापर करतात, हे दुर्दैवी आहे. केनेकर यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, आता यावर शरद पवार गट आणि मनोज जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
एकिकडे आंदोलन सुरू असताना, राज्य सरकारने मराठा समाजासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावरील वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माहिती दिली आहे. या निर्णयामुळे वंशावळीच्या नोंदी शोधण्याचे काम अधिक काळासाठी सुरू राहणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या
- मराठा आणि कुणबी एकच आहेत, याची अंमलबजावणी करावी.
- हैदराबाद, सातारा, आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करावे.
- ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांच्या 'सगेसोयरे' यांनाही कुणबी म्हणून मान्यता द्यावी.
- आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.
- मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण द्यावे.












Click it and Unblock the Notifications