बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारा लढवय्या, त्यांच्या माहित नसलेल्या या गोष्टी वाचा
Balasaheb Thackeray Birth Anniversary : आज 23 जानेवारी 2025 रोजी, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. विचारांवर ठाम असणारे नेते ते स्वःतला सत्ता मिळत असतानाही सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणारा नेता..महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जीवाची पर्वा न करणारा नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यांना संघर्षाचा आणि चळवळीचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे निडर व्यक्तिमत्त्व आणि विचार आजही महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजात प्रभावी आहेत.
प्रेरणादायी, स्फुर्ती चेतवणारा नेता
बाळासाहेब ठाकरे फक्त एक राजकारणी नव्हे, तर एक प्रेरणादायी नेते होते. त्यांचे जाज्वल्य विचाराने शिवसैनिकांत आणि मराठीजनांच्या हृदयात स्फुर्तीचा झरा वाहायचा. ज्यांचे योगदान महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात खूप महत्वाचे आहे. आपण आज त्यांच्या काही खास गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

..जेव्हा बाळासाहेब नोकरी करायचे!
बाळासाहेब ठाकरे हे कलासक्त होते. एक कलाकार आणि कलाप्रेमी म्हणून त्यांनी टाइम्स ऑफ इंडियात व्यंगचित्रकार म्हणून नोकरीला सुरुवात केली. त्यांनी आपली कला जपली आणि अखेरपर्यंत जगली. बाळासाहेब ठाकरे हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. त्यांच्या चित्रांची टाइम्स ऑफ इंडिया मध्ये छापली जात.
1966 मध्ये शिवसेनेची स्थापना
बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. 'शिवसेना म्हणजे शिवाजी महाराजांची सेना' अशी त्यांची भूमिका होती, आणि त्याच विचारधारेवर आधारित त्यांनी महाराष्ट्रात आणि देशात हिंदुत्वाचा जाज्वल्यमान संदेश दिला.
नीडर नेते, प्रभावी भाषणशैली
बाळासाहेब ठाकरे हे नीडर आणि धाडसी नेते होते. त्यांचे विचार कणखर आणि भाषणे नेहमीच प्रभावी आणि प्रखर होती. ते कधीही कागदाच्या आधारावर बोलत नव्हते. त्यांच्या भाषणांनी प्रत्येक श्रोत्यावर अमिट ठसा ठेवला. विरोधकांना कडवट शब्दांद्वारे घेरणारे बाळासाहेब त्याच वेळी त्यांचे प्रशंसा करताना त्यांच्या शरणागत असलेल्या शत्रूंना मित्र बनवू शकत होते. त्यांच्या भाषणांची अशी धार होती की, ते ऐकणारा प्रत्येक व्यक्ती मंत्रमुग्ध होऊन जात असे.
राजकारणातील हुकमी एक्का
बाळासाहेब यांच्या कार्याची आणि कार्यपद्धतीची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचा राजकारणातील दबदबा. बाळासाहेब कधीही स्वतः कुणाला भेटायला गेले नाहीत. त्यांना भेटण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर मातोश्रीवर पोहोचत असत. जगप्रसिद्ध गायक मायकेल जॅक्शन, प्रसिद्ध क्रिकेटपटू जावेद मियाँदाद असो की, शरद पवार, नरेंद्र मोदी अटलबिहारी वाजपेयी ते अनेक दिग्गज त्यांना भेटायला मातोश्रीवर यायचे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळेच त्यांनी एक अशी ओळख निर्माण केली होती की, त्यांना भेटण्यासाठी तिथे सर्वच राजकीय नेत्यांची गर्दी होत असे.
कधीच लढवली नाही निवडणूक
मी शेवटपर्यंत निवडणूक लढवणार नाही. खुर्ची माझ्यासाठी नव्हे तर सामान्य शिवसैनिकांसाठी आहे. सामान्य मराठी माणसाला मुख्यमंत्री करायचे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते आणि ते त्यांनी खरे करुन दाखवले. त्यांनी आयुष्यात कधीही निवडणूक लढवली नाही. ते अत्यंत स्वतंत्र विचारसरणीचे करारी नेते होते. त्यांनी कधीच निवडणूक लढवली जरी नसली तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा निर्णय अंतिम मानला जात होता.
बाळासाहेब ठाकरेंचे 2012 मध्ये निधन
बाळासाहेब ठाकरे यांचे 2012 मध्ये निधन झाले. हा दिवस शिवसेना आणि शिवसैनिकांसाठी अत्यंत दुःखद दिवस होता. त्यांच्या अंत्यदर्शन आणि अंत्यविधीसाठी मुंबई थांबली होती. त्यादिवशी मुंबईत लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित होते. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीवनातील योगदानाला 21 तोफांच्या सलामीने मान्यता देण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार आणि कार्य आजही प्रेरणा देत आहेत.












Click it and Unblock the Notifications