आमदारकीची आणि मंत्रीपदाचीही हॅट्ट्रीक... अतुल सावेंनी करुनच दाखवलं
Atul save biography : औरंगाबाद पूर्व मतदारसंघात भाजपच्या अतुल सावेंनी यावेळी हॅट्ट्रिक केली. अतुल रावे यांनी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा २१६१ मतांनी पराभव केला होता. यंदाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून ते विसाव्या फेरीपर्यंत इम्तियाज जलील आघाडीवर होते. मात्र, शेवटच्या फेरीत सावेंनी विजयश्री खेचून आणत या मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवला. याच अतुल सावेंना यावेळी भाजपने पुन्हा मंत्रीपदाची संधी दिली आहे.
यापूर्वी होते गृहनिर्माण मंत्री
भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून तिसऱ्यांदा मैदान मारले. यापूर्वी २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर ते पहिल्यांदा निवडून गेले होते. त्यानंतर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आले. 2022 मध्ये शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपदी होते. महापालिकेच्या निवडणुकीतही त्यांच्यावर मोठी जवाबदारी देण्यात आली होती. ती त्यांनी लिलया पार पाडली होती. आता पुन्हा त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

गेल्या पंचवार्षिकमध्ये दोनदा संधी
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला त्यात यापूर्वी मंत्री राहिलेल्या अनेकांना संधी मिळाली होती. औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांना सुद्धा दुसऱ्यांदा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मंत्रिपदाची संधी मिळाली. यापूर्वी शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात सावे यांना राज्यमंत्री पद मिळाले होते. मात्र शेवटच्या टप्प्यात त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली.
वडीलही होते खासदार
शिवसेनेचे मराठवाड्यातील पहिले खासदार आणि औरंगाबादचे सेनेचे पहिले महापौर मोरेश्वर दीनानाथ यांचे पुत्र असलेले अतुल सावे यांनी 2014 मध्ये भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली. याच निवडणुकीत त्यांना यश मिळाले. त्यांनतर राज्यात युतीची सत्ता आली. मात्र सावे यांना सरकारचा तीन-चार महिन्याचा कालावधी शिल्लक असतांना मंत्रिपद मिळाले. त्यांच्याकडे उद्योग आणि खनिकर्म अल्पसंख्यांक विकास व वक्फ बरोबरच हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जवाबदारी मिळाली. आता पुन्हा एकदा सावे यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
मराठवाड्याचा आश्वासक चेहरा
भाजपकडून सावे यांना मंत्रीपद देण्यात आल्याने मराठवाड्यात भाजपची ताकद वाढणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादमध्ये आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहे. भाजपने यापूर्वी कराड यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रीपद येथे दिले आहे. त्यात आता सावे यांच्या निमित्ताने राज्य सरकारमध्ये कॅबिनेट पद देऊन भाजपकडून आगामी महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरु केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सावे यांच्यावर पक्षाची मोठी जवाबदारी असणार आहे.












Click it and Unblock the Notifications