वाल्मिक कराडला कोण वाचवतंय..? अंजली दमानियांचा थेट नाव घेऊन आरोप
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपींना मोक्का लावण्यात आला. याबाबत आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या आरोपींना मोक्का लावला मात्र या आरोपींनी ज्याला व्हिडीओ काँल केला त्या आरोपीला मोक्का का लावण्यात आला नाही, असा सवाल दमानिया यांनी केला आहे. वाल्मिक कराडला कोण वाचवतंय, असा प्रश्न उपस्थित करत आता अंजली दमानिया यांनी थेट नाव घेऊन काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

तोच धागा पकडला
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्ह्यातील आ. सुरेश धस, आ. प्रकाश साळुंके, आ. संदीप क्षीरसागर, खा. बजरंग सोनवणे यांनी अनेकदा थेट वाल्मिक कराडचे नाव घेतले होते. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही वाल्मिक कराडचे नाव घेत सरकारला धारेवर धरले आहे. वाल्मिक कराडला कोण वाचवतंय, असा सवाल दमानिया यांनी केला आहे.
व्हिडीओ काँल कुणाला?
या प्रकरणावर बोलतना दमानिया म्हणाल्या की, हा खून सात जणांनी केलाय, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्या सातही आरोपींवर मोक्का लावला गेलाय. मात्र या आरोपीला आठव्या आरोपीला व्हिडिओ कॉल करुन मारहाण केलेली दाखवली होती. तो आठवा आरोपी अजून मारण्यास सांगत होता. तो कसा सुटला, असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला. त्याच्यावर कुणाचा वरदहस्त आहे? त्याच्यावर कारवाई करण्याची हिम्मत शासनात नाही का? असे म्हणत दमानिया यांनी केला आहे.
कराडला कोण वाचवतेय?
अंजली दमानिया यांनी या प्रकरणात आता थेट वाल्मिक कराडचे नाव घेतले. त्या म्हणाल्या, वाल्मीक कराड हा सरकारचा जावई असल्यासारखा त्याला वागवला जात आहे. वाल्मीक कराड यांचं सगळ्यांबरोबर अगदी चांगलं गणित आहे. त्याच्यावर धनंजय मुंडे आणि काही प्रमाणात पंकजा मुंडे यांचा वरदहस्त असल्याचा, आरोप दमानिया यांनी केला. जोपर्यंत दबाव आहे, तोपर्यंत वाल्मिकवर मोक्का लावण्यात येणार नाही, असा आरोपही दमानिया यांनी केला.
तर देशमुख जिवंत असते
या प्रकरणावर बोलताना अंजली दमानिया यांनी गृहमंत्रालयालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्या म्हणाल्या, आवादा कंपनीने त्यांना खंडणी मागितली जात असल्याची तक्रार मे महिन्यात केली होती. मात्र त्यानंतर सात महिने त्यांच्या तक्रारीवर काहीच कारवाई झाली नाही. सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांची नावे या कंपनीने मे महिन्यातच सांगितली होती. मात्र तरीही टाईमपास करण्यात आला. जर मे महिन्यातच या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली असती तर आज संतोष देशमुख जिवंत असते, असा आरोप दमानिया यांनी केला.












Click it and Unblock the Notifications