चंद्राबाबू नायडू 'वर्षा'वर; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
मुंबई : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आज सकाळी ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले. आंध्रप्रदेश व महाराष्ट्रात परस्पर सहकार्य वाढवून विकास कसा साधता येईल, या विषयावर या दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. मात्र या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी खळबळजनक विधान केले आहे.

भेट नेमकी कशासाठी?
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री राममोहन नायडू आणि खासदार श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते. या भेटीत एकमेकांना लागून असलेल्या आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्याचा विकास कसा साधता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती आहे. चंद्रबाबू नायडू हे शनिवारी अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त मुंबईमध्ये आले आहेत. आज त्यांनी सकाळीच वर्षा निवासस्थान गाठले.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीबद्दल बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "चंद्रबाबू नायडू आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे..? चंद्रबाबू नायडू यांची ही एक शिष्टाचार भेट होती. हा एक शिष्टाचाराचा भाग आहे. महाराष्ट्र आणि चंद्राबाबू नायडू यांचे काही समीकरण नाही. इतर राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा आपल्या राज्यात येतात. तेव्हा ते मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात. परंतु चंद्राबाबू नायडू हे इंडिया आघाडी सोबत नसल्याकारणानं त्यांनी इतर कुणाची भेट घेतली नाही.
नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे. त्यांच्याकडे बहुमत नाही. मोदी सरकार चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार यांच्या टेकूवर टिकलं आहे. देवानं जर त्यांना सद्बुद्धी दिली तर हे सरकार कोसळू शकतं," असं म्हणत संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली.












Click it and Unblock the Notifications