महाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा अन् दशा बदलणारी; भाजप पदाधिकाऱ्यांना अमित शहांनी दिला कानमंत्र
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राची आगामी विधानसभा निवडणूक देशाची दिशा अन् दशा बदलणारी असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. त्यांनी महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईनद्वारे संवाद साधला. या बैठकीतील वृत्त आता विश्वसनिय सूत्रांकडून मिळाले आहे. शहा हे मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना विजयासाठी कानमंत्र दिला आहे.
शहांचा महाराष्ट्रातील तिसरा दौरा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आगामी आठवडाभरात घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच भाजप नेते अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. महिन्याभरातील हा त्यांचा तिसरा महाराष्ट्र दौरा आहे. या दौऱ्यात ते मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी, मेळाव्याच्या सुरुवातीलाच त्यांनी कार्यकर्त्यांना भाषणाचा व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्ड न करण्याचा सल्ला दिला. तसेच महाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा अन् दशा बदलणारी असल्याचाही दावा केला.

माझा अनुभव सांगतो, यंदा विजय...
या बैठकीत मार्गदर्शन करताना अमित शाह म्हणाले की, सामान्य कार्यकर्त्यापासून भाजपच्या अध्यक्षपदापर्यंत मी मजल मारली. त्यामुळे मला कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नेहमीच आनंद होतो. काही निवडणुका देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात. हे मी माझ्या अनुभवाने सांगतो. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही तशीच आहे. या निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणाची दिशा अन् दशा बदलेल. कारण, मागील 60 वर्षांत कोणताही राजकीय पक्षाला सलग 3 वेळा जिंकण्याची कामगिरी करता आली नाही.
संपूर्ण देशाचे महाराष्ट्राकडे लक्ष...!
निवडणुकीच्या निमित्ताने मी देशभर फिरत आहे. सगळीकडे झारखंड किंवा हरयाणात काय होणार? असे कुणीही विचारत नाहीत. केवळ महाराष्ट्रात काय होणार? असा प्रश्न विचारतात, असे नमूद करत अमित शहा यांनी यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून महाराष्ट्रात काय होणार? असा प्रश्न केला. त्यावर कार्यकर्त्यांनी आपण जिंकणार असा पुकारा केला. तसेच महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येणार असा विश्वासही व्यक्त केला.
राहुल गांधींवरही साधला निशाणा
अमित शहा यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आतापर्यंत किती निवडणुका जिंकल्या? एखाद्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला 85 टक्के गुण मिळाले, पण नेहमी 20 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 30 टक्के गुण मिळाले, तर तो विद्यार्थी गावभर मिठाई वाटतो. राहुल गांधी असा मूर्खपणा करत आहेत. विजयी होणाराच सरकार स्थापन करतो. त्यामुळे निराशेला गाडून कामाला लागा. महाराष्ट्रात भाजप महायुतीचे सरकार येईल असा मी शब्द देतो.












Click it and Unblock the Notifications