विरोधी पक्ष दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत; शहा यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी गर्जना!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (दि. २७ ऑक्टोबर २०२५) मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाच्या भूमिपूजन समारंभात कार्यकर्त्यांना एक खास संदेश दिला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड एकजुटीने काम करावे, असे आवाहन करत त्यांनी "विरोधकांचा सुफडासाफ करा, ते दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत!" अशी जोरदार गर्जना केली.
नवीन भाजप कार्यालयाचे भूमीपूजन!
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. पक्षाच्या नवीन कार्यालयाच्या भूमिपूजनाबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील सर्व भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

कार्यालय म्हणजे मंदिर
"पक्षाची स्थापना झाल्यापासून लहान कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांना माहिती आहे की कार्यालय हे आपले मंदिर आहे. कार्यालयात कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होते. इतर पक्षांसाठी कार्यालय फक्त काम करण्याचे ऑफिस असेल, पण भाजपसाठी कार्यालय म्हणजे मंदिरच आहे."
भाजप नेहमीच सिद्धांताच्या आधारे नीती घडवते आणि भारत व भारतीय लोकांच्या हितासाठी कठोर संघर्ष करते, आणि या तिन्ही उद्देशांची पूर्ती कार्यालय हेच ठिकाण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
'कुबड्या' नाहीत, भाजप स्वतःच्या बळावर उभे!
राजकीय वाटचालीबद्दल बोलताना अमित शाह यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या वाढलेल्या ताकदीवर जोर दिला. "आता भाजप कुठल्याही कुबड्यांचा आधार न घेता देखील चालतो. भाजप आता स्वतःच्या बळावर उभे आहे." महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजप आता एक मजबूत स्वाक्षरी म्हणून दिसत आहे, असे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
भव्य कार्यालय आणि अटलजींची भविष्यवाणी
मुंबईत साकार होणाऱ्या ५५ हजार चौरस फुटांच्या या भव्य कार्यालयाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यालयात लायब्ररी, कॉन्फरन्स रूम्स, प्रदेशाध्यक्षांचे कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांचेही कार्यालय असणार आहे. "हे कार्यालय मुख्यमंत्र्यांना आठवण करून देईल की येथूनच निवडून जायचे आहे.
जनसंघानंतर जेव्हा भाजपची स्थापना झाली, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी "कमल खिलेगा" अशी भविष्यवाणी केली होती. आज ११ वर्षांपासून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, ही भाजपसाठी गौरवाची बाब आहे, असे शाह यांनी सांगितले.
घराणेशाहीवर प्रहार: 'परफॉर्मन्स' महत्त्वाचा
भाजपने जपलेल्या लोकशाहीवादी मूल्यांवर भर देत अमित शाह यांनी पक्षातील घराणेशाहीच्या अभावाचे महत्त्व स्पष्ट केले. ज्या नेत्यांनी कठीण परिस्थितीत पक्षाला मजबूत केले, विचारांचे बीज लावून त्याचा वटवृक्ष केला, त्या सर्व कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना त्यांनी प्रणाम केला.
बुथ प्रमुख ते अध्यक्ष
भारतात एकमेव भाजप हा असा पक्ष आहे, जिथे बुथ प्रमुख हा पक्षाचा आणि देशाचा अध्यक्ष होऊ शकतो." आमचा पक्ष घराणेशाहीनुसार चालत नाही. ज्याच्यात क्षमता आहे, तोच मोठा नेता होतो. एका गरीब चहावाल्याचा मुलगा तीन वेळा पंतप्रधान होतो, यापेक्षा लोकशाहीवादी पार्टीत आमचा विश्वास किती दृढ आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे." ज्यांच्या पक्षात लोकशाहीवादी पद्धतीने निवड होत नाही, तिथे लोकशाहीचे रक्षण होऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी घराणेशाहीवर प्रहार केला.












Click it and Unblock the Notifications