काळाचं बोलावणं आलं की जावं लागतं; चार दिवसांपूर्वीच्या त्या शब्दांनी महाराष्ट्र सुन्न!
बारामती: राज्याच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्राणज्योत मालवली आहे. मुंबईहून बारामतीकडे येत असताना त्यांच्या विमानाला बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर भीषण अपघात झाला. या अपघातात अजितदादांसह विमानातील इतर पाच जणांचाही मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

नियतीचा क्रूर घाला: ४ दिवसांपूर्वीच्या 'त्या' विधानाची चर्चा
या अपघाताच्या चार दिवस आधीच अजित पवार यांनी मृत्यू आणि जीवनाच्या शाश्वततेबद्दल एक भावनिक विधान केले होते. त्यांच्या निधनानंतर या विधानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, समर्थकांच्या काळजाचे पाणी होत आहे.
अजितदादा नेमके काय म्हणाले होते? एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले होते की, "कोण इथे कायमचं राहणार आहे? तुम्ही-आमी आज असू, उद्या नसू. काळाचं आणि नियतीचं बोलावणं आलं की प्रत्येकाला जावंच लागतं. राजकारण हे सर्वस्व नाही, निवडणुका संपल्या की ते विसरायला हवं. आपण आपल्या हयातीत जनतेच्या हिताची कामं केली पाहिजेत."
काळाच्या या बोलावण्याबद्दल बोलताना त्यांना इतक्या लवकर निरोप घ्यावा लागेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती.
बारामतीवर दुःखाचा डोंगर
आपल्या लाडक्या नेत्याच्या निधनाची बातमी समजताच बारामतीसह संपूर्ण राज्यातून कार्यकर्ते बारामतीकडे धाव घेत आहेत. शहरात सर्वत्र शांतता पसरली असून समर्थकांना अश्रू अनावर झाले आहेत. अनेक दिग्गज नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून, महाराष्ट्राने एक कार्यक्षम आणि निर्णयाचा पक्का असलेला नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.












Click it and Unblock the Notifications