Maharashtra Budget 2024: महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लागू, अजित पवारांची मोठी घोषणा
मुंबई: अजित पवारांकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात झाली आहे. अजित पवारांनी सुरूवातीलाच मोठी घोषणा केली आहे. राज्यातील महिलांच्या समृद्धीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महाराष्ट्रात लागू होणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे.
अजित पवार म्हणाले, महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंब, सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटींचा निधी दिला जाईल. जुलै २०२४ पासून अंमलबजावणी सुरू करण्यात येईल.

मुख्ममंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत श्री तुकाराम महाराजांचं नाव घेत अर्थसंकल्पाची सुरुवात केली. मुख्ममंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. तसेच प्रतिदिंडी २० हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तर वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण अशा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. पात्र कुटुंबाना वर्षाला ३ मोफत सिलिंडर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींसाठी महत्त्वाच्या घोषणा
अजित पवार यांनी पुढे सांगितले की, राज्यातील व्यावसायिक शिक्षणात मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. अभियांत्रिकी, वास्तूशास्र, वैद्यकीय तसंच कृषीविषयक अभ्यासाठी प्रवेशीत ८ लाख पर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या निर्णयाचा लाभ २ लाख ५ हजार मुलींना होणार. २०२४-२५ पासून योजना सुरू होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपयांचं साहाय्य
अजित पवार पुढे म्हणाले, राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. ई पंचनामा प्रमाली संपूर्ण राज्यात लागू. शेतकऱ्यांना १ रुपयांत पिक विमा देण्याची योजना कायम करणार. गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येणार आहे. जुन्या गोदामांची डागडुजी करण्यात येणार. तसेच कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५ हजार रुपयांचं साहाय्य देणार असल्याची मोठी घोषणा अजित पवारांनी केली.
राज्यात नवीन शासकीय महाविद्यालयांची स्थापना
अजित पवार पुढे म्हणालेस राज्यात सध्या १ लोकसंख्येमागे ८४ डॉक्टर्स आहेत. २०३५ पर्यंत १ लाख लोकसंख्ये मागे १०० हून अधिक डॉक्टर्स करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवणं आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवी शासकीय महाविद्यालये आणि ४३० खाटांची संलग्न रुग्णालये स्थापन करण्यास मान्यता दिल्याची घोषणा अजित पवारांनी केली.
जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक,जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, अंबरनाथ इथे शासकीय महाविद्यालयं उभारले जातील.












Click it and Unblock the Notifications