महाराष्ट्राचा धगधगता 'अजित' सुर्य मावळला; दादांचे 'ते' स्वप्न राहिले अधुरे, NCPचे काय होणार?
Ajit Pawar death news : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पोलादी व्यक्तिमत्व, कामाचा उरक असलेला धडाडीचा नेता आणि जनसामान्यांचे 'अजितदादा' यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या भीषण अपघाताने केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. राज्याच्या राजकारणात ज्यांच्या शब्दाला वजन होते आणि ज्यांच्या कार्यपद्धतीचा दरारा होता, असा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
अजित पवार यांची राजकीय कारकीर्द झंझावाती राहिली. त्यांनी सहा वेळा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र, त्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या मनात एक सुप्त इच्छा नेहमीच होती-ती म्हणजे राज्याचे 'मुख्यमंत्री' बनण्याची.
अनेकदा संधी जवळ येऊनही नियतीने त्यांना उपमुख्यमंत्रिपदावरच रोखले होते. सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणात ते लवकरच राज्याचे नेतृत्व करतील, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना खात्री होती. मात्र, आजच्या या भीषण अपघाताने दादांचे ते 'मुख्यमंत्री' होण्याचे स्वप्न कायमचे अधुरे राहिले आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्राचे 'दादा'पर्व संपले: अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत; वाचा त्यांची कारकीर्द
कार्यकर्त्यांचा हक्काचा आधार गेला
अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर लाखो कार्यकर्त्यांचा 'आधारवड' होते. पहाटे पाच वाजल्यापासून जनतेच्या तक्रारी ऐकून घेणारा आणि जागेवरच अधिकाऱ्यांना आदेश देऊन प्रश्न सोडवणारा असा नेता पुन्हा होणे कठीण आहे. "दादांकडे काम घेऊन गेलं की ते होणारच," हा विश्वास आज पोरका झाला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच बारामतीसह संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांनी एकच टाहो फोडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) भवितव्य काय?
अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर आता मोठे संकट उभे राहिले आहे. पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळणारा, कार्यकर्त्यांची फळी बांधणारा आणि निवडणुकांचे अचूक नियोजन करणारा सेनापती हरपल्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही घटना पक्षाला मोठा धक्का देणारी आहे. आता पक्षाचे नेतृत्व कोण करणार आणि कार्यकर्त्यांना उभारी कोण देणार, हा मोठा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
नेत्यांच्या शोकसंवेदना: "एक लढवय्या सहकारी गमावला"
या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे,
शरद पवार काय म्हणाले?
"अजितच्या जाण्याने माझ्या कुटुंबातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ निखळला आहे. तो केवळ माझा पुतण्या नव्हता, तर राजकारणातील एक सक्षम आणि कष्टाळू नेता होता. राज्याचे मोठे नुकसान झाले आहे," अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
"अजितदादांच्या जाण्याने मी माझा एक जवळचा मित्र आणि मंत्रिमंडळातील एक अत्यंत कार्यक्षम सहकारी गमावला आहे. प्रशासनावर त्यांची पकड विलक्षण होती. महाराष्ट्राच्या विकासातील त्यांचे योगदान विसरता येणार नाही. हे नुकसान भरून काढणे अशक्य आहे."
महाराष्ट्राचे मोठे नुकसान
अजित पवारांची ओळख 'विकासाचा माणूस' अशी होती. सिंचन क्षेत्र असो, राज्याची तिजोरी (अर्थ मंत्रालय) असो किंवा पायाभूत सुविधांचे प्रकल्प, दादांनी प्रत्येक ठिकाणी आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक 'डॅशिंग' नेतृत्व गमावले आहे.












Click it and Unblock the Notifications