R.R. पाटलांनी केसाने गळा कापला, अजित पवारांनी का केला आरोप; काय होता सिंचन घोटाळ्याचा वाद!
Maharashtra Assembly Election 2024 : तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून संजय काका पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. ते भाजपचे नेते होते, परंतु त्यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करत दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या मुलाच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.
या उमेदवारी अर्ज भरण्याच्या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना अजितदादांनी धक्कादायक गोप्यस्फोट करत सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे खापर हे दिवंगत नेते आर. आर. (आबा) पाटील यांच्यावर फोडले. जिवाभावाचा मित्र असून देखील त्यांनी माझी चौकशी लावल्याने माझी वाट लागली, असेही अजित पवार म्हणाले. या गौप्यस्फोटाने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

दादा म्हणाले, हा केसाने गळा कापण्यासारखा प्रकार
भाजपने आरोप केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे खापर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्यावर फोडले आहे. त्यावेळी माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. आणि चौकशीची करण्यासाठी फाईल तयार करण्यात आली. त्या फाईलवर आर. आर. आबांनी सही केली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर हा केसाने गळा कापण्यासारखा प्रकार असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.
कामं 42 हजार कोटीं अन् आरोप 70 हजार कोटींचा
अजित पवार सभेत बोलताना म्हणाले की, इतक्या वर्षात केवळ बेचाळीस हजार कोटी रुपयांची कामे झाली होती. तरी माझ्यावर 70 हजार कोटींचा आरोप झाला. मात्र आकडा जेवढा मोठा आकडा, तितके लोक गंभीरतेने घेतात. म्हणून आकडा मोठा केला असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. या आरोपांमुळे माझ्या चौकशीची फाईल तयार झाली. ती फाईल सही करण्यासाठी गृह विभागाकडे गेली. त्यावर आर. आर. पाटील यांनी सही देखील केली. त्या नंतर ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर सही केली नाही. त्याच वेळी आम्ही सरकारचा पाठिंबा काढला आणि सरकार पडून राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतरच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर सही केली आणि मला बोलवून आर. आर. पाटील यांनी सही केल्याचे दाखवले, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.
जिवाभावाचा सहकारी असून सही केली
अजित पवार म्हणाले की, आर. आर. पाटील यांनी या चौकशीच्या फाईलवर सही केली, हे मला कळल्यानंतर मला अत्यंत वाईट वाटले. आपला जिवाभावाचा सहकारी असून देखील त्यांनी तसे केले. आपले काहीतरी चुकले असेल, म्हणूनच त्यांनी अशी सही केली असेल. असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या या विधानामुळे आता राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.
काय आहे सिंचन घोटाळा, कसा झाला वाद?
1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ 0.1 टक्क्यांची सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्याच इकोनॉमिक सर्व्हे मध्ये होतं. या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. सिंचन प्रकल्पांच्या कंत्राट वाटपात तसंच त्यांच्या पूर्ततेमध्ये अनियमतता आढळली अशी नोंद CAG ने आपल्या अहवालात केली होती. 2001 ते 2011-12 या काळात CAGने जलविभागाचे सात ऑडिट केले. त्यात दीर्घकालीन नियोजनाचा अभाव, प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात अनिश्चितता, प्रकल्प पूर्ण करण्यास लागलेला वेळ, वन विभागाची परवानगी न घेता काही ठिकाणी प्रकल्प सुरू करणं याबाबतीत नियमांची पायमल्ली झाल्याचं निरीक्षण CAGनं मांडलं होतं. अनेक प्रकल्पांसाठी नियोजित केलेल्या किमतींमध्ये अनेक पटींनी वाढ झाल्याचं CAGनं म्हटलं. 601 प्रकल्पांपैकी 363 प्रकल्पांची नियोजित रक्कम वाढून 47,427 कोटी रुपयांवर गेल्याचं CAG ने म्हटलं.












Click it and Unblock the Notifications