अजित पवारांचा काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीकारावर विश्वास
मुंबई - लोकसभा निवडणुकीत अवघ्या एका जागेवरच विजय मिळवू शकलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांनी काँग्रेसचे रणनितीकार नरेश अरोरा यांच्यावर विश्वास टाकला असून आपल्या पक्षाचे रणनितीकार म्हणून अरोरांची त्यांनी निवड केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बहुतांश ४० आमदार अजित पवार यांच्या गटात सामिल झाले. पण एवढे संख्याबळ असूनही लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फारसे यश प्राप्त झाले नाही.
महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्याविरोधात मतं दिली. हे शल्य पाहता अजित पवार गटाने आता महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठोस पाऊले उचलली आहेत.
अजित पवारांचे आमदारांना मार्गदर्शन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अजित पवार गटाने सोमवारी नरेश अरोरा यांची निवडणूक रणनीतीकार म्हणून निवड केली. त्यादरम्यान, पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकीचे नियोजन आणि ध्येयधोरणांबाबत पक्षाच्या आमदारांना संबोधित केले.
अरोरांनी सांभाळली कर्नाटकची मोहिम
अरोरा यांनी राजकीय मोहीम कंपनी डिसीजन बाॅक्स्ड (DesignBoxed)ची स्थापना केली आहे. डिझाईन बॉक्स्डने राजस्थान, कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या प्रचाराचे व्यवस्थापन केले आहे. ते काँग्रेसचे निवडणूक रणनितीकार असून त्यांनी राजस्थानमध्येही निवडणुकीची कमान सांभाळली होती. ते एक यशस्वी रणनितीकार म्हणून सर्वांना परिचित आहेत.
अजित पवारांची ९० दिवसांचा प्लॅन
काल पक्षाच्या बैठकीत नरेश अरोरा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे ब्रँडिंग आणि रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार कॅम्पच्या आमदारांसमोर मांडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या लोकप्रिय योजनांवर प्रकाश टाकला आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, जनमत आपल्या बाजूने झुकवण्यासाठी त्यांच्या पक्षाने ९० दिवसांची योजना आखली आहे.
या मुद्द्यांवर आगामी काळात भर
प्राप्त माहितीनुसार, अजित पवार यांची प्रतिमा ब्रँडिंग आणि उंचावणे, प्रशासकीय कौशल्ये, विश्वासार्हता आणि आश्वासने पूर्ण करण्याची वचनबद्धता यासारख्या ताकदीचा प्रचार करण्यावरही पक्ष लक्ष केंद्रित करेल. दरम्यान, आमदारांना विरोधकांच्या खोट्या विधानांकडे दुर्लक्ष करून विकास योजनांच्या अंमलबजावणी आणि प्रचारावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications