पत्नीने फोन ब्लॉक केल्याने पित्याने चार मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीच्या रागातून एका पित्याने आपल्या चार लहान मुलांसोबत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कोऱ्हाळे शिवारात ही घटना घडली असून, यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. हे कुटुंब मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील असून, पत्नी माहेरी येवला येथे गेल्याने हा वाद झाला होता.

नेमकं काय घडलं?
श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील अरुण सुनील काळे (वय ३०) याची पत्नी शिल्पा काळे यांच्यात वाद झाल्यामुळे ती येवला तालुक्यातील तिच्या माहेरी गेली होती. ती परत येत नसल्यामुळे, अरुण काळे आपल्या चार मुलांसह तिला घेण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता. प्रवासात त्याने पुन्हा पत्नीशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीने त्याचा फोन नंबर ब्लॉक केल्याने संपर्क होऊ शकला नाही. दारूच्या नशेत आणि या घटनेने संतप्त झालेल्या अरुणने रागाच्या भरात आपले चारही मुलं - शिवानी (वय ८), प्रेम (वय ७), वीर (वय ६) आणि कबीर (वय ५) यांना कोऱ्हाळे येथील एका विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर त्याने स्वतःही त्याच विहिरीत उडी घेतली.
अखेर विहिरीत आढळले मृतदेह
ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. कोऱ्हाळे येथील पोलीस पाटील सुरेश गमे यांनी विहिरीत दोन मृतदेह तरंगताना दिसल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. विहिरीतील पाण्याची खोली ३० ते ३५ फूट असल्यामुळे, शिर्डी आणि राहाता नगरपरिषदेच्या आपत्ती निवारण पथकाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. बचाव पथकाने दोरखंडाच्या साहाय्याने एकापाठोपाठ एक असे पाचही मृतदेह बाहेर काढले.
तपास सुरू, आत्महत्येची शक्यता
पोलिसांनी सांगितले की, मृत अरुण काळे आपल्या मुलांना अहिल्यानगर येथील एका आश्रमशाळेतून केस कापण्याच्या बहाण्याने घेऊन निघाला होता. तो सासरवाडीला जात असतानाच हा दुर्दैवी प्रकार घडला. पत्नीसोबत फोनवर वाद झाल्यानंतर त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे ही आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, पत्नीशी झालेल्या वादामुळेच हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेहांचे शवविच्छेदन करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.












Click it and Unblock the Notifications