41 वर्षांनंतर भारताचा अंतराळात पुन्हा झेंडा, शुभांशु शुक्ला यांची ऐतिहासिक झेप
25 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजता, भारताचे एअरफोर्स अधिकारी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी अंतराळात झेप घेत ऐतिहासिक कामगिरी केली. Axiom-4 या खासगी मोहिमेअंतर्गत ते चार सदस्यीय अंतराळवीर पथकासोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले आहेत. यामुळे भारताच्या अंतराळ प्रवासात 41 वर्षांनंतर नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

1984 साली राकेश शर्मा यांनी सोविएत संघाच्या 'सोयूझ' यानातून अंतराळात प्रवेश केला होता. त्यानंतर भारताच्या वतीने दुसऱ्यांदा एखाद्या अंतराळवीराची थेट अंतराळ मोहिमेसाठी निवड झाली असून शुभांशु ही जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी असलेल्या शुभांशु शुक्ला यांनी यासाठी इस्रो आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात कठोर प्रशिक्षण घेतले होते.
स्पेसएक्सच्या रॉकेटद्वारे Axiom-4 मिशनचे यशस्वी प्रक्षेपण
स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटने Axiom-4 मोहिमेतील सर्व अंतराळवीरांना ड्रॅगन कॅप्सूलमध्ये घेऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रक्षेपित केलं. या पथकाचे नेतृत्व अनुभवी कमांडर पॅगी व्हिटसन करत असून त्यांच्यासोबत हंगेरीचे टिबोर कपू आणि पोलंडचे स्लोव्होज विस्निव्हस्की हे अन्य तज्ज्ञ अंतराळवीर आहेत.
वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार या मिशनची सुरुवातीची 15 मिनिटे निर्णायक असून संपूर्ण मोहिम 14 दिवसांची असणार आहे. यामध्ये भारतीय तंत्रज्ञान, बियाण्यांवरील प्रयोग, जीवाणूंचा अभ्यास, तसेच माणसाच्या स्नायूंच्या पुनरुत्पादनक्षमतेवर संशोधन केले जाणार आहे.
इस्रोचा मोठा सहभाग; भारतीय प्रयोग घेऊन गेले शुभांशु
या मिशनसाठी इस्रोने अंदाजे ₹550 कोटी खर्च केले असून, शुभांशु अंतराळ स्थानकात 7 स्वतंत्र वैज्ञानिक प्रयोग पार पाडणार आहेत. यामध्ये भारतीय सूक्ष्म गुरुत्व प्रयोग, कडधान्यांच्या अंकुरण प्रक्रियेचा अभ्यास, मानवी पेशींवर गुरुत्वहीनतेचा प्रभाव, तसेच भात, टोमॅटो आणि वांग्याच्या बियाण्यांवर गुरुत्वशून्य वातावरणाचा परिणाम यांचा समावेश आहे.
या उलट, 1984 मध्ये जेव्हा राकेश शर्मा अंतराळात गेले होते, तेव्हा भारताने फारसा खर्च केला नव्हता कारण त्या वेळी सोविएत संघाने पूर्ण खर्च स्वतः उचलला होता. मात्र यावेळी भारताने एक स्वतंत्र जबाबदारी घेतली आहे.
Axiom-4 ही मोहीम केवळ भारतासाठी नव्हे तर आंतरराष्ट्रीय खाजगी अंतराळ मिशनसाठीही एक नवा अध्याय ठरत आहे. शुभांशु शुक्ला यांचे अंतराळातले हे पाऊल पुढील भारतीय अंतराळविज्ञानाच्या वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications