चीन-म्यानमारने वेढलेला, 77 लाख लोकसंख्येच्या 'लाओस' दौऱ्यावर मोदी, भारतासाठी हा देश का महत्त्वाचा?
PM Modi to visit Laos : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दोन दिवसीय लाओस दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्याच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 व्या आसियान-भारत शिखर परिषदेमधेय तसेच 19 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेमध्ये देखील सहभागी होणार आहेत.
विशेष बाब म्हणजे अवघ्या 77 लाख लोकसंख्या असलेल्या लाओस या देशाच्या दौऱ्यावर भारताचे प्रमुख का जात आहेत. भारतासाठी हा देश किती महत्त्वाचा आहे, अशी चर्चा देखील राजकीय पटलावर होऊ लागली आहे. चला तर जाणून घेऊया, चीन अन् म्यानमार सारख्या देशाने वेढलेल्या लाओस दौऱ्यावर भारताचे पंतप्रधान का गेले आहेत.

लाओस भारतासाठी महत्त्वाचे का आहे?
लाओस हा देश भारतासाठी का महत्त्वाचा आहे. यावर प्रथम जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. आग्नेय आशियातील हा एकमेव भूपरिवेष्टित देश आहे. हे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, लाओसच्या उत्तर-पश्चिम भागाला म्यानमार आणि चीन देशांचा समावेश होतो. तर पूर्वेस व्हिएतनाम, आग्नेय-पूर्वेस कंबोडिया आणि पश्चिम आणि नैऋत्येला थायलंड आहे. चीन आणि म्यानमारने वेढलेले असल्याने भारतासाठी या देशाचे राजकीयदृष्या अतिशय महत्त्व आहे. खरे तर, आग्नेय आशियातील भौगोलिक स्थानामुळे लाओस हे व्यापाराच्या दृष्टीकोनातून नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. यामुळेच तो कधी फ्रान्सने तर कधी जपानच्या ताब्यात गेला. 1953 मध्ये लाओसला स्वातंत्र्य मिळाल्यावर चीननेही लाओसमध्ये आपला प्रभाव पाडण्यास सुरुवात केलेली होती.
भारत अन् लाओस यांच्यातील संबंध कसे?
लाओस या देशाला 1953 साली स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारत आणि लाओस या दोन्ही देशांचे संबंध हे 1956 म्हणजेच अवघ्या तीन वर्षात प्रस्थापित झाले. दोन्ही देशाच्या धोरणात्मक गरजा लक्षात घेत हे संबंध प्रस्थापित झाल्याचे सांगितले जात आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1954 मध्ये लाओसला भेट दिली होती, तर भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी 1956 मध्ये लाओसला भेट दिली होती यावरून लाओसचे महत्त्व कळू शकते. खरे तर दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या विस्तारवादी धोरणांमुळे भारत लाओसला रणनीतीच्यादृष्टीने अधिक महत्त्वाचे स्थान देत आहे.
दोन्ही देशात अनेक धोरणात्मक निर्णय
लाओसची मेकाँग नदी हा मालवाहू आणि प्रवाशांच्या वाहतुकीचा मुख्य मार्ग आहे. लाओस या नदीवर वीज निर्मिती करून शेजारील देशांना पुरवतो. 2008 मध्ये भारताने लाओसमध्ये हवाई दल अकादमी उघडण्याचा निर्णय घेतला होता. लाओ लष्कराला भारताकडून वेळोवेळी आधुनिक तंत्रज्ञान देण्यात आले आहे. भारताने सिंचन आणि ऊर्जा प्रकल्पांसाठीही अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यापाराशी संबंधित अनेक करार दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करतात.
लाओस भारताच्या बाजूने खंबीरपणे उभा
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य होण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना लाओस पाठिंबा देत आहे. राममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळीही लाओसने राम लला यांच्यावर टपाल तिकीट काढले होते. असे करणारा हा जगातील पहिला देश होता. कोरोनाच्या काळातही भारताने लाओसला मदत केली. ज्याचे लाओसने खूप मनापासून धन्यवाद देखील व्यक्त केले होते. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध किती चांगल्या पद्धतीने प्रस्थापित झालेले आहेत, हे दिसून येते.












Click it and Unblock the Notifications