पाकिस्तानकडून सर्वात मोठा खुलासा; आमच्याकडे अणुबॉम्ब आहे का हे समजायला...
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव शिगेला पोहोचला. या क्रूर हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. यानंतर केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर आणि लष्करी ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले. याप्रकरणी आता पाकिस्तानातून एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे.

पाकिस्तानचे माजी गृहमंत्री आणि सध्या पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार असलेले राणा सनाउल्लाह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले, "भारताकडून जेव्हा ब्रह्मोस क्रूझ मिसाइल डागण्यात आलं, तेव्हा त्यात अण्वस्त्र आहे की नाही हे ओळखण्यासाठी पाक लष्कराकडे फक्त ३० ते ४५ सेकंदांचा वेळ होता. या वेळेत निर्णय घेणं फार धोकादायक होतं."
"अणुहल्ला झाला आहे की नाही हे कळायला वेळच नव्हता"
सनाउल्लाह पुढे म्हणाले की, भारताने जर अण्वस्त्र वापरले असते आणि पाकिस्तानने चुकून तसाच समज करून प्रत्युत्तर दिलं असतं, तर त्यातून एक जागतिक अणुयुद्ध उभं राहिलं असतं. त्यांनी स्पष्ट केलं की, "मी भारताने अण्वस्त्र वापरले नसल्याबद्दल त्यांची प्रशंसा करत नाही, पण आमच्या लष्कराने चुकीची प्रतिक्रिया दिली असती तर परिणाम भयावह झाले असते."
भारताने 'नूर खान' एअरबेसवर केला होता हल्ला
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांवर लक्ष्य साधलं. यामध्ये इस्लामाबादजवळील नूर खान (चकलाला) एअरबेस वर हल्ला करण्यात आला. हा बेस पाकिस्तानी हवाई दलासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हल्ल्यात रनवे, हँगर आणि महत्त्वाच्या इमारतींना लक्ष्य करण्यात आलं आणि उपग्रह छायाचित्रांमध्ये झालेल्या नुकसानीचे स्पष्ट पुरावे दिसून आले.
या व्यतिरिक्त सरगोधा, भोलारी, जैकबाबाद, सुक्कुर आणि रहीम यार खान या एअरबेसवरही भारताने मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचे उघड झाले आहे.
१९७१ नंतर पुन्हा नूर खान बेसवर कारवाई
हा पहिलाच प्रसंग नाही, जेव्हा भारताने नूर खान बेसला लक्ष्य केलं आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात, इंडियन एअर फोर्सच्या २० स्क्वाड्रनने हॉकर हंटर विमानांतून या ठिकाणी जोरदार हल्ला केला होता. इतिहास पुन्हा एकदा पुनरावृत्त झाला असं म्हणायला हरकत नाही.
दहशतवादाविरोधात निर्णायक पाऊल
भारताच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांचे तळ नेस्तनाबूत करण्यात आले. पहलगाममधील निष्पाप नागरिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने घेतलेली ही आक्रमक भूमिका पाकिस्तानसाठी धक्का ठरली आहे.
एक चुकीचा निर्णय, जागतिक अणुयुद्ध?
या संघर्षातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे - म्हणजे दोन्ही देशांकडे असलेल्या अण्वस्त्रांची साखळी. ज्या वेगाने निर्णय घ्यावा लागतो, त्या परिस्थितीत कोणतीही चूक दोन्ही देशांसाठी आणि जगासाठी विनाशकारी ठरू शकते. राणा सनाउल्लाह यांचा खुलासा हेच अधोरेखित करतो की, शांततेसाठी सुसंवाद आणि संयम अत्यावश्यक आहे.












Click it and Unblock the Notifications