3 क्रिकेटपटूंना ठार मारुन पाकचा अफगाणशी युद्धविराम! भारताविरुद्ध पाकची बाजू घेणाऱ्या देशाची मध्यस्ती
Pakistan afghanistan agree ceasefire : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमाभागात सुरू असलेल्या तीव्र संघर्षावर आता तात्काळ युद्धविराम लागू होणार आहे. कतार आणि सिंदूर ऑपरेशनदरम्यान पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या तुर्कियेने केलेल्या मध्यस्थीनंतर दोन्ही शेजारी राष्ट्रांनी यावर सहमती दर्शवली आहे. मात्र, या युद्धविराम कराराच्या एक दिवस आधी झालेल्या पाकिस्तानी हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटू ठार झाल्याने दोन्ही देशांतील तणाव अजूनही कायम आहे.

युद्धविरामावर सहमती
कतारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने शनिवारी (स्थानिक वेळेनुसार) दोहा येथून ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. दोहा येथे झालेल्या शांतता चर्चेनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने तात्काळ युद्धविराम लागू करण्याचे मान्य केले आहे. केवळ युद्धविरामच नव्हे, तर तो दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी पुढील काही दिवसांत दोन्ही देशांचे प्रतिनिधी पुन्हा बैठक घेणार आहेत. हा महत्त्वपूर्ण राजनैतिक करार कतार आणि तुर्किये यांच्या मध्यस्थीने झाला आहे. या कराराचा उद्देश सीमाभागातील तणाव कमी करणे आणि दोन्ही राष्ट्रांमध्ये शांतता व स्थिरता प्रस्थापित करणे हा आहे.
हल्ल्यात अफगाण क्रिकेटपटू ठार
तात्काळ युद्धविराम लागू होण्यापूर्वी, पाकिस्तानने आधी अफगणिस्तानवर मोठा हल्ला केला. अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील उरगुन जिल्ह्यात केलेल्या हवाई हल्ल्यात तीन स्थानिक क्रिकेटपटूंसह एकूण आठ सामान्य नागरिक ठार झाले.
मृत्यू झालेले 'हे' तीन युवा क्रिकेटपटू
कबीर, सिबगतुल्ला, हारून हे तिन्ही खेळाडू पक्तिका प्रांताची राजधानी शरना येथे एका मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात सहभागी होऊन परतले होते. याच दरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) या हल्ल्याचा तीव्र निषेध करत पाकिस्तानसोबतची आगामी त्रिकोणीय टी-२० क्रिकेट मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानसह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी या हल्ल्याला 'अनैतिक आणि रानटी' कृत्य म्हणत तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
२०२१ नंतर पाक अफगााण सीमाभागातील सर्वात तीव्र संघर्ष
२०२१ मध्ये तालिबान सत्तेत परतल्यानंतर सीमालगत भागातील हिंसाचाराच्या सर्वात तीव्र टप्प्यांपैकी एक टप्पा हा होता, यानंतर दोहा येथे चर्चा सुरू झाली आहे. युद्धबंदी प्रभावीपणे अंमलात आणली जाईल आणि कालांतराने ती कायम राहील याची खात्री करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सल्लामसलत सुरू ठेवण्यावर सहमती या बैठकीत दर्शविण्यात आली. या चर्चेचे नेतृत्व अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मुल्ला मुहम्मद याकूब आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी केले, ज्यांनी संघर्षाला संवाद आणि सहकार्याने बदलण्याची गरज यावर भर दिला.












Click it and Unblock the Notifications