नेपाळमध्ये अराजतेचा कहर; पंतप्रधान केपी ओली यांचा राजीनामा, अर्थमंत्र्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण!
Nepal Gen Z revolution 2025 : नेपाळमध्ये भयानक राजकीय घडामोडी घडत असून, 'जनरल-झेड' (Generation Z) च्या नेतृत्वाखालील जनआंदोलनाने पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले आहे.
भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात सुरू झालेल्या या आंदोलनामुळे नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये अराजकतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
त्यामुळे अखेर, 9 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान ओली यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेला निर्णायक वळण मिळाले. तर आक्रमक आंदोलकांनी नेत्यांच्या घरांची जाळपोळ केली तर अर्थमंत्र्यांना पार पळून पळून अन् कपडे फाटोस्तोर बेदम मारहाण केली.

पंतप्रधानांचा राजीनामा आणि लष्कराचा हस्तक्षेप
सोमवार, ८ सप्टेंबर रोजी ओली सरकारने २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हा निर्णय 'जनरल-झेड'च्या आंदोलनाला शांत करू शकला नाही. ९ सप्टेंबर रोजी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी 'ओली राजीनामा द्या', 'भ्रष्टाचार थांबवा' अशा घोषणा देत संसदेकडे कूच केली. परिस्थिती हाताबाहेर जात असताना लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांनी थेट पंतप्रधानांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. सिग्देल यांनी स्पष्ट केले की, ओली सत्तेवरून पायउतार झाल्यासच सैन्य देशात स्थिरता आणू शकेल. यानंतर, ओलींनी दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले, ज्यासाठी हिमालय एअरलाइन्सचे खाजगी विमान त्रिभुवन विमानतळावर सज्ज होते. मात्र, लष्कराच्या दबावाखाली अखेर ओलींनी राजीनामा दिला.
सरकार कोसळण्याची प्रमुख कारणे
१. आरएसपीचा पाठिंबा काढणे
रवी लामिछाने यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (आरएसपी) जनरल-झेडच्या आंदोलनाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला होता. या पक्षाच्या २१ खासदारांनी सामूहिक राजीनामे दिल्याने ओली सरकार अल्पमतात आले.
२. मंत्र्यांचे राजीनामे
आरएसपीच्या पाठोपाठ जनता समाजवादी पक्षाचे (जेएसपी) चार मंत्री, ज्यात गृहमंत्री रमेश लेखक यांचाही समावेश होता, यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले. यामुळे ओली सरकारला मोठा धक्का बसला.
हिंसक निदर्शने आणि नेत्यांच्या घरांवर हल्ले
आंदोलकांनी फक्त सरकारविरोधात घोषणाच दिल्या नाहीत, तर नेत्यांच्या घरांवरही हल्ले केले. ही परिस्थिती इतकी गंभीर झाली की अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल यांना संतप्त जमावाने मारहाण केली. त्यांचे कपडे फाडून त्यांचा पाठलाग करण्यात आला आणि त्यांना विमानाने सुरक्षित स्थळी हलवावे लागले.
याशिवाय, प्रचंड, देउबा आणि रमेश लेखक यांच्या घरांवरही हल्ले झाले. या घटना ५ ऑगस्ट २०२४ रोजी बांगलादेशात झालेल्या क्रांतीची आठवण करून देतात, जिथे निदर्शकांनी शेख हसीना यांच्या निवासस्थानावर कब्जा केला होता.
सध्या नेपाळमध्ये राजकीय पोकळी निर्माण झाली असून, राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष आणि सीपीएन-माओवादी सेंटरने संसद विसर्जित करून तातडीने निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. लष्कर देश स्थिर करण्याचा प्रयत्न करत असले तरी, पुढील काळात नेपाळच्या राजकारणाची दिशा काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications