इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यांचा आक्रमक पवित्रा; मोजतबा खामेनी US-इस्रायलवर बरसले, होर्मुझ बंद..
Mojtaba Khamenei First Message to US Israel : अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर इराणची सत्ता हाती घेतलेले त्यांचे सुपुत्र आणि नवे सर्वोच्च नेते इमाम सय्यद मोजतबा होसेनी खामेनी यांनी आज (१२ मार्च २०२६) आपला पहिला अधिकृत संदेश जारी केला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या चार दिवसांत आलेल्या या लेखी संदेशात मोजतबा यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आखाती अरब शेजाऱ्यांवरील हल्ले सुरूच ठेवण्याचा आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाकी होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) दबावाचे साधन म्हणून बंद ठेवण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. इराणी माध्यमांनी या संदेशाचे वर्णन "इस्लामिक क्रांतीचा नवा संकल्प" असे केले आहे.

'शहीदांच्या रक्ताचा सूड घेणार'; मोजतबा यांचा थेट इशारा
सरकारी टीव्हीवर वाचन करण्यात आलेल्या या संदेशात मोजतबा खामेनी यांनी अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या लढाईत इराण मागे हटणार नाही, हे स्पष्ट केले आहे. त्यांच्या संदेशातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
होर्मुझ बंद राहणार: जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला होर्मुझचा जलमार्ग दबावाचे साधन म्हणून बंदच ठेवला पाहिजे.
अमेरिकन तळ लक्ष्य: मध्य पूर्वेतील सर्व अमेरिकन लष्करी तळ बंद केले पाहिजेत, अन्यथा त्यांच्यावर हल्ले केले जातील.
सूडाची भाषा: विशेषतः मिनब शाळेतील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 'शहीदांच्या' रक्ताचा सूड घेतला जाईल आणि त्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही.
शेजाऱ्यांवर हल्ले सुरूच: आखाती अरब शेजाऱ्यांवरील हल्ले थांबणार नाहीत.
जागतिक बाजारपेठ हादरली; तेलाचे दर १०० डॉलर्स पार
मोजतबा खामेनी यांच्या या जहाल संदेशानंतर काही तासांतच जागतिक ऊर्जा बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. पर्शियन आखातात इराणकडून टँकर्सवर झालेल्या संशयास्पद हल्ल्यांमुळे आणि होर्मुझ बंद करण्याच्या इशाऱ्यामुळे तेलाच्या किमती पुन्हा एकदा १०० डॉलर्स प्रति बॅरलच्या वर गेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने (IEA) इतिहासातील सर्वात मोठ्या तेल पुरवठा व्यत्ययाचा इशारा दिला आहे. दरम्यान, इराणने तेलाच्या किमती २०० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात, असा धमकीवजा इशारा यापूर्वीच दिला आहे.
युद्धभूमी तेहरान ते जेरुसलेम
गुरुवारी इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक शक्तिशाली स्फोट झाले, तर इस्रायलने इराणमध्ये "व्यापक" हल्ल्यांची नवीन लाट सुरू केली आहे. दुसरीकडे, जेरुसलेममध्ये इराणी क्षेपणास्त्रांचा आवाज ऐकू आला असून युद्धाची भीषणता वाढत आहे. इस्रायलने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहविरुद्ध आपली मोहीम तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
भारतावर काय परिणाम? तेलमंत्र्यांचे आश्वासन
मध्य पूर्वेतील या भयंकर युद्धाचा भारतावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. भारताने होर्मुझच्या बाहेरील स्रोतांकडून कच्च्या तेलाची आयात एकूण आयातीच्या ७०% पर्यंत वाढवली आहे. केंद्रीय तेल मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत आश्वासन दिले की, "देशाचा तेल पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे."
या तणावादरम्यान एक दिलासादायक बातमी म्हणजे, सौदी अरेबियातील रास तनुरा येथून निघालेला आणि एका भारतीयाच्या नेतृत्वाखालील लायबेरियन टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे मुंबईत दाखल झाला आहे. इराणने या जहाजाला या मोक्याच्या मार्गावरून जाण्याची परवानगी दिली होती.
मोजतबा खामेनी: वडिलांच्या कट्टर धोरणांचे वारसदार
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायली हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी (वय ८६) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या ३७ वर्षांच्या राजवटीनंतर, ८ मार्च रोजी इराणच्या तज्ञांच्या सभेने त्यांचे ५६ वर्षीय सुपुत्र मोजतबा खामेनी यांची देशाचे तिसरे सर्वोच्च नेते म्हणून निवड केली. मोजतबा हे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यांनी अद्याप कोणतेही सार्वजनिक भाषण दिलेले नाही, त्यामुळे त्यांचा हा पहिलाच लिखित संदेश इराणच्या भावी कट्टर धोरणांचे आणि संघर्षाचे स्पष्ट संकेत देणारा ठरला आहे.












Click it and Unblock the Notifications