बांगलादेश इस्कॉनने चिन्मय प्रभू यांना सर्व पदावरुन हटवले; नेमकं काय घडलं, त्यामुळे ही कारवाई का केली
Chinmoy Das Prabhu removed from all ISKCON posts : बांगलादेश इस्कॉनने गुरुवारी चिन्मय प्रभू यांची सर्व पदांवरून हकालपट्टी केली. संघटनेचे सरचिटणीस चारू चंद्र दास ब्रह्मचारी यांनी अनुशासनहीनतेचा आरोप करत त्यांच्या कार्याचा इस्कॉनशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. चिन्मय प्रभू यांच्या अटकेसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान वकील सैफुल इस्लाम अलिफ यांच्या मृत्यूशी त्यांच्या संघटनेचा काहीही संबंध नाही, असेही दास यांनी स्पष्ट केले.
ढाका न्यायालयाने इस्कॉनबंदीची मागणी फेटाळली
तत्पूर्वी दुपारी ढाका उच्च न्यायालयाने इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली. कोर्टात बांगलादेशच्या अंतरिम सरकारने सांगितले की, आम्ही इस्कॉनच्या कारवाईंविरुद्ध आवश्यक पावले उचलली आहेत. या प्रश्नाला सरकारचे प्राधान्य आहे. इस्कॉन प्रकरणात आतापर्यंत 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून 33 जणांना अटक करण्यात आल्याचे सरकारने सांगितले. देशात कोणत्याही प्रकारची अशांतता निर्माण होऊ नये यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे.

न्यायालयाने सांगितले की, यावर सरकार निर्णय घेईल. किंबहुना, इस्कॉन मंदिराचे प्रमुख चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर संघटनेशी संबंधित वाद वाढत चालला आहे. दास यांना तुरुंगात पाठवल्यानंतर बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. याशिवाय, यामुळे बांगलादेश आणि भारत सरकारमधील संबंधांमध्येही दुरावा निर्माण झाला आहे.
बांगलादेश इस्कॉन मुद्द्यावर मोदी-जयशंकर भेट
काही माध्यमांच्या अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशमधील इस्कॉन प्रकरणाबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांना तेथील परिस्थितीची माहिती दिली.
भारतीय इस्कॉनने सर्व आरोप फेटाळले
भारतातील इस्कॉनचे कम्युनिकेशन डायरेक्टर ब्रिजंद नंदन दास यांनी इस्कॉनवर बांगलादेशातील दहशतवादी आणि कट्टरतावादी संघटना असल्याचा आरोप निराधार आणि खोटा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, भारतात आणि जगभरात कोणीही हे आरोप मान्य करणार नाही. दास म्हणाले की, बांगलादेशातील गरजूंना मदत करणाऱ्या आणि लोकांसाठी भंडारा आयोजित करणाऱ्या भाविकांची हत्या करण्यात आली आहे. मला आशा आहे की बांगलादेशचे अंतरिम सरकार दोषींवर कठोर कारवाई करेल आणि हिंदूंना सुरक्षा देईल.
हे ही वाचा : ISKCON बांगलादेशचे पुजारी चिन्मय कृष्णदास कोण आहेत, त्यांना पोलिसांनी का केली अटक?
इस्कॉन ही कट्टरतावादी संघटना असल्याचा आरोप
26 नोव्हेंबर रोजी चितगावमध्ये इस्कॉन प्रमुखाचा जामीन फेटाळण्यात आला, त्यानंतर झालेल्या हिंसाचारात सैफुल इस्लाम या वकीलाचा मृत्यू झाला. यानंतर 27 नोव्हेंबर रोजी बांगलादेश उच्च न्यायालयात इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. याचिका दाखल करणाऱ्या वकिलाने सैफुलच्या मृत्यूमागे इस्कॉनच्या लोकांचा हात असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. अशा स्थितीत या संघटनेवर बंदी घातली पाहिजे. या याचिकेत चितगावमध्ये आणीबाणी जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली होती. या याचिकेवर बांगलादेशचे ॲटर्नी जनरल मुहम्मद असदुझ्झमन यांनी इस्कॉनचे वर्णन धार्मिक कट्टरतावादी संघटना असे केले होते.
चिन्मय प्रभू कोण आहेत?
चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांचे खरे नाव चंदन कुमार धर आहे. ते चितगाव इस्कॉनचे प्रमुख आहेत. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी देश सोडला. त्यानंतर हिंदूंच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडल्या.
यानंतर बांगलादेशी हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सनातन जागरण मंचची स्थापना करण्यात आली. चिन्मय प्रभू त्याचे प्रवक्ते झाले. सनातन जागरण मंचच्या माध्यमातून चिन्मयने चितगाव आणि रंगपूरमध्ये अनेक सभांना संबोधित केले. त्यात हजारो लोक सहभागी झाले होते.












Click it and Unblock the Notifications