मोठी बातमी! कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; कारण नेमकं काय?
प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभमेळा सुरु आहे. त्यात मौनी आमावस्येच्या दिवशी म्हणजेच २८ व २९ जानेवारीला चेंगराचेंगरीची घटना घडली होती. सरकारी आकडेवारीनुसार ३० भाविक त्यात मृत्यूमुखी पडले होते. शिवाय ६० भाविक जखमी झाले होते. या प्रकारानंतर महाकुंभातील भाविकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. न्यायालयाने याचिकाकर्त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले.

नेमके काय घडले?
प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी शाही स्नानासाठी करोडी भाविक जमा झाले. त्यानंतर अचानक चेंगराचेंगरी झाली. त्यात ३० भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एका याचिकाकर्त्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली. त्याची आज सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी करण्यास नकार दिला. न्यायालयाने याचिकाकर्त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले. अलाहाबाद उच्च न्यायालयात यापूर्वीच याचिका दाखल करण्यात आल्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या युक्तिवादाची न्यायालयाने दखल घेतली. 29 जानेवारी रोजी झालेल्या कुंभ चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
काय होते याचिकेत
भाविकांच्या मदतीसाठी महाकुंभात विविध भाषांमधील फलक लावावेत, सर्व राज्यांनी त्यांची स्वतःची सुविधा केंद्रे तयार केली पाहिजेत, जेणेकरून राज्य आपत्कालीन परिस्थितीत आपल्या लोकांना मदत करू शकेल. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तयार राहा, सुरक्षा प्रोटोकॉलची माहिती एसएमएस आणि व्हॉट्सॲपद्वारे दिली जावी. व्हीआयपी संचलनामुळे सर्वसामान्य भाविकांच्या सुरक्षेवर परिणाम होऊ नये आणि त्यांना कोणताही धोका पोहोचू नये. महाकुंभात भाविकांच्या प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी अनेक मार्ग तयार करावेत. चेंगराचेंगरीच्या घटनेचा अहवाल सादर करावा. निष्काळजी व्यक्ती व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. आदी मागण्या या याचिकेत करण्यात आल्या होत्या.
प्रकरणात कटाचा संशय
या चेंगराचेंगरीत कटा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही मिडिया हाऊसने दिलेल्या बातम्यांनुसार यूपी एसटीएफ आणि महा कुंभमेळा पोलीस कटाच्या कोनातून या घटनेचा तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या दोन लोकांनी सांगितले की, भगवे झेंडे घेऊन काही लोक अचानक जमावात घुसले. त्यामुळे चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. या दाव्यांची पुष्टी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. त्यावेळी सक्रिय असलेले काही मोबाईल सतत बंद असल्याचे एसटीएफच्या निदर्शनास येत आहे. यामुळे कटाचा संशयही बळकट होत आहे. एसटीएफ संगम नाक्यावर 16 हजारांहून अधिक ॲक्टिव्ह मोबाईल फोनची तपासणी करत आहे. यापैकी १०० हून अधिक क्रमांकाची पोलिसांकडून पाळत सुरु असल्याचे सांगितले जात आहे.












Click it and Unblock the Notifications