राहुल गांधी EVM विरोधात आक्रमक; महाराष्ट्रातील 'या' गावातून काढणार लाँग मार्च
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी गाजली. गुरुवारी महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. स्पष्ट बहुमत असतानाही महायुतीच्या मंत्रीमंडळाला उशीर झाला. त्यापूर्वी महायुतीने यश मिळविल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएम विरोधात रान उठवले. ईव्हीएम विरोधातला राग आता अजूनही शांत होताना दिसत नाही. सोलापूर जिल्ह्यातील मारकळवाडीत ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं, यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. आता याच मारकळवाडीतून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे स्वतः ईव्हीएमविरोधात लाँग मार्च काढणार असल्याचं समजतंय.

मारकडवाडीत झाला होता विरोध
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी EVM मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. त्यांनी EVM ची सत्यता तपासण्यासाठी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केला होता. या ठरावानंतर मारकडवाडी राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी तहसीलदारांनी सहकार्य करावे, अशी विनंती मारकडवाडीचे सरपंच व्ही. जी. मारकड यांनी केली होती. मात्र ही मागणी प्रशासनाने फेटाळली. यानंतर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी मध्यस्थी करत हा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं होतं. प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचंही जानकर म्हणाले होते.
निकालानंतर संताप वाढला
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सोलापूरातून ईव्हीएमविरोधातील वातावरण चांगलंच तापलंय. आता याच मारकडवाडीतून ईव्हीएम विरोधात मोठा लाँग मार्च काढला जाणार आहे. यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वतः उपस्थितीत राहणार असल्याची माहिती, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली. हा लाँग मार्च नंतर इतर ठिकाणीही जाणार असल्याचे नियोजन करण्यात येत असल्याचं समजतं. मात्र आता मारकडवाडीतील या आंदोलनाची चर्चा आता चांगलीच वाढली आहे. मारकडवाडीतील ठिणगी देशभर वनवा पेटवेल, असा विश्वास आ. उत्तम जानकर यांनी व्यक्त केला.
वंचितकडूनही ईव्हीएमविरोधात आंदोलन
महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात संताप व्यक्त केला जात असताना आता वंचित बहुजन आघाडीनेही याविरोधात मोहिम उघडली आहे. वंचितकडून राज्यभरात EVM विरोधात जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून या आंदोलनास सुरुवात करून ते टप्प्याटप्प्याने तीव्र करण्यात येणार आहे. पुण्यात रविवारी झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 3 डिसेंबरपासून स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात झाली असून ती 16 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.












Click it and Unblock the Notifications