Parshuram Jayanti : परशुरामांना आईचा वध का करावा लागला?, पुन्हा जीवंत कसे केले?, जाणून घ्या कहाणी
Parshuram Jayanti 2025 : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी परशुराम जयंती साजरी केली जाते. यावेळी परशुराम जयंती २९ एप्रिल रोजी म्हणजेच आज साजरी केली जात आहे. रामायण असो किंवा महाभारत या दोन्ही काळात भगवान परशुराम यांचा संबंध येतो. प्रचंड क्रोधित होणारे हे ऋषीमुनी त्यांच्या स्वभावच्या कथा कायमच सांगितल्या जात आहेत. परशुरामांचे वडील जमदग्नी ऋषी आणि आई रेणुका होते. एकदा त्याच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण झाली की, त्यांच्या वडिलांच्या आदेशावरुन त्यांनी चक्क प्रिय आईचा हातातील कुऱ्हाडीने वध केला. त्यानंतर त्यांनी आईला जीवंत देखील केले.
नेमकी ही कथा काय आहे, त्यांना आईचा वध का करावा लागला. यासह क्षत्रियांवर ते इतके का रागावले. की त्यांना त्यांना पृथ्वीवरून नष्ट करण्याची शपथ घेतली. परशुरामांबद्दल अनेक कथा आहेत. त्या कथांचा सारांश आढावा आज आपण जयंतीनिमित्त जाणून घेणार आहोत..!

परम मातृभक्त परशुराम!
परशुराम यांनी आपल्या आईचा वध केला ही घटना सर्वपरिचित आहे. मात्र, त्यामागचे कारण हे वेगळं आहे. आईचा द्वेष होता म्हणून त्यांनी आईचा वध केला नव्हता. भगवान परशुराम यांचा उल्लेख मातृ- पितृभक्त म्हणूनही केला जातो. जर त्यांनी अकारण वध केला असता, तर त्यांना ही उपाधी मिळाली नसती. म्हणून या कृतीमागचे कारण देखील समजून घेणे गरजेचे आहे.
जमदग्नीपुत्र रामचा परशुराम कसा झाला?
एखाद्याचा राग विकोपाला गेला तर आपण त्याला जमदग्नीचा अवतार अंगात शिरलाय का, असे सहज शब्द वापरतो. यावरून जमदग्नी ऋषींच्या क्रोधाबद्दल आपल्याला कल्पना येईल. ते निर्विवादपणे विद्वान होते, परंतु त्यांचा रागावर अनावर होत असे. मात्र त्यांचे वैशिष्ट्य असे होते, की एका क्षणात त्यांचा राग विकोपाला जायचा अन् त्वरीत तो निवळूनही जायचा. परंतु क्रोधावर नियंत्रण ठेवणे त्यावरुन कठीण असते.
ते आणि त्यांची पत्नी रेणुका यांना अक्षय्य तृतीयेच्या रात्री पुत्र झाला. त्याचे नाव राम ठेवले होते. तो देखील वडिलांप्रमाणे शीघ्र कोपी होता. त्याने तपश्चर्येने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. तेव्हा शंकरांनी त्याला आपल्याजवळच परशु भेट दिला. तेव्हापासून या जमदग्नी पुत्राला परशुराम अशी ओळख मिळाली.
परशुरामांना आईचा वध का करावा लागला!
जमदग्नी ऋषींनी एका यज्ञाचे अनुष्ठान आपल्या मठात माडंले. त्यासाठी त्यांनी माता रेणुका यांना नदीवरून पाणी घेऊन येण्यास सांगितले. रेणुका माता कलश घेऊन नदीवर गेली असता, तिथे स्वर्गातील गंधर्व आणि अप्सरा जलक्रीडा करत होते. ते दृश्य पाहताना रेणुका मातेचे देहभान हरपले आणि ती पाणी आश्रमात घेऊन जायचे आहे, हेच विसरली. जेव्हा ती भानावर आली, तेव्हा खूप उशीर झाला होता. तिला उशीर झाल्यामुळे जमदग्नी ऋषींना यज्ञ करता आला नाही. जमदग्नी ऋषींना क्रोधीत व्हायला तेवढे कारण पुरेसे होते.
रेणुका माता परतल्यावर जमदग्नी ऋषींनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या मुलांना तिचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांची मुले मान खाली घालून उभी राहिली. त्यामुळे अधिक क्रोधीत होऊन त्यांनी त्यांच्या चारही मुलांना चेतना शून्य केले. मात्र पाचवा पुत्र परशुरामांनी वडिलांचा स्वभाव ओळखून काहीही विचार न करता थेट माता रेणुका मातेचा हातातील परशु म्हणजे कुऱ्हाडीने शिरच्छेद केला.
सर्वांना धक्का बसला
परशुरामांची कृती पाहून सर्वांनाच धक्का बसला. आपल्या पत्नीचा मृत देह पाहून जमदग्नी ऋषीदेखील भानावर आले. आपल्या आज्ञेबद्दल त्यांना वाईट वाटले तसेच आपल्या मुलाच्या पितृभक्तीला पाहून ते प्रसन्न झाले.
त्यांनी परशुरामांना वर मागण्यास सांगितला. तेव्हा परशुराम म्हणाले, मला आई परत हवी आहे, तिला जिवंत करा. या वरदानामुळे जमदग्नी ऋषी संतुष्ट झाले आणि त्यांनी आपल्या मंत्र सामर्थ्याने रेणुका मातेला जीवित केले.
तसेच, दुसरा वरदानात आपल्या चारही चेतना शून्य भावंडांची चेतना पुन्हा देण्याचे वरदान मागितले. तिसरे वरदान स्वतःसाठी मागितले, त्यानुसार त्यांचा कोणत्याही शत्रू आणि युद्धामध्ये पराजय होणार नाही तसेच दीघायुष्य प्राप्त व्हावे. पिता जमदग्नी ऋषी मुलाचे हे वरदान ऐकून प्रसन्न झाले आणि त्यांची इच्छा पूर्ण होण्याचा आशीर्वाद दिला. अशा प्रकारे ही कहाणी पुरानांमधून आपल्याला सांगितली जाते.












Click it and Unblock the Notifications