'ऑपरेशन सिंदूर'ला किती देशांचा पाठिंबा? परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणतात...
भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'वर बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. १९३ पैकी केवळ तीन देशांनी या कारवाईला विरोध केला, हे भारताच्या यशस्वी मुत्सद्देगिरीचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणताही मध्यस्थ नव्हता, उलट पाकिस्ताननेच शस्त्रसंधीसाठी पुढाकार घेतल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानचे जागतिक स्तरावर 'बनाव' उघड
पुढे बोलताना जयशंकर म्हणाले की, भारताने पाकिस्तानला जगासमोर उघडे पाडले आहे. मुदीरके आणि बहावलपूरवर हल्ला करण्याची कोणी कल्पनाही केली नसेल. इतकेच नव्हे तर, ब्रिक्स आणि क्वाडसारख्या व्यासपीठांवर भारताने पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणला आहे, असेही त्यांनी सांगितले.
टीआरएफला जागतिक दहशतवादी संघटना घोषित
लोकसभेत बोलताना जयशंकर म्हणाले की, पहलगाममधील घटनेनंतर भारत जगासोबत उभा राहिला आणि त्याने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. टीआरएफला (TRF) जागतिक दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना भारताने कसे हाणून पाडले, हे त्यांनी स्पष्ट केले. आज टीआरएफ ही जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित झाली आहे. आपल्या नागरिकांचे संरक्षण करणे हा भारताचा हक्क आहे, यावर त्यांनी भर दिला.
दहशतवादाविरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण
परराष्ट्र मंत्रालयाचे काम पाकिस्तानचे कट उघड करणे हे होते आणि दहशतवादाविरोधात 'झिरो टॉलरन्स'चे धोरण स्वीकारले आहे, असे जयशंकर म्हणाले. भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) आपली बाजू मांडली आणि दहशतवादाबाबत 'झिरो टॉलरन्स'चे धोरण असल्याचे जगाला सांगितले, ज्याला यूएनएससीनेही मान्यता दिली, असे त्यांनी स्पष्ट केले.
गोगोईंच्या प्रश्नावर राजनाथ सिंहांचे प्रत्युत्तर
खासदार गोगोई यांनी बैसरनमधील हल्ल्यानंतर रुग्णवाहिका पोहोचायला एक तास लागला आणि सैन्य पायी आल्याचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तानला चीनकडून किती मदत मिळाली आणि पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी का झाली, असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला.
यावर उत्तर देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना, पाकिस्तानने आपली जमीन भारताच्या विरोधात दहशतवाद पसरवण्यासाठी वापरणार नाही, ही भारताची अट पाकिस्तानने मान्य केली होती. पण दुर्दैवाने २००९ मध्ये शर्म-अल-शेख करारात तत्कालीन सरकारने मोठी चूक केली, असे त्यांनी नमूद केले.
'आमच्या नागरिकांना माराल तर आम्ही गप्प बसणार नाही'
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, दहशतवादाविरुद्धची आपली लढाई केवळ सीमेवरच नाही, तर वैचारिक पातळीवरही लढली जात आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हे आपल्या सामर्थ्याचे प्रतीक होते, ज्यातून आपण दाखवून दिले की, जर कोणी आपल्या नागरिकांना मारले तर भारत गप्प बसणार नाही, असे ते म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, 'ऑपरेशन सिंदूर' कोणत्याही दबावाखाली थांबवण्यात आले नव्हते. तर, संघर्षापूर्वी आणि त्यादरम्यान जी राजकीय आणि लष्करी उद्दिष्टे निश्चित केली होती, ती आपण पूर्णपणे साध्य केली असल्यामुळे भारताने कारवाई थांबवली. राजनाथ सिंह यांनी माहिती दिली की, आपल्या सैन्याने केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचे ९ ठिकाणे लक्ष्य करण्यात आली, ज्यात शंभराहून अधिक दहशतवादी ठार झाले. यापैकी बहुतेक जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते.
पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज कसे मिळाले? - हुडा
काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंह हुडा यांनी प्रश्न विचारला की, पाकिस्तान गुडघ्यावर असताना शस्त्रसंधी का केली? शस्त्रसंधीपूर्वी अमेरिकेने ट्वीट केले आणि परराष्ट्र धोरणावरही प्रश्न उपस्थित केले, असे ते म्हणाले. कोणत्याही देशाने पाकिस्तानचा निषेध केला नाही आणि संघर्षादरम्यानच आयएमएफने (IMF) त्याला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले, यावर हुडा यांनी चिंता व्यक्त केली. अमेरिकेने २८ वेळा शस्त्रसंधी घडवून आणल्याचा दावा केला, परंतु भारताच्या पंतप्रधानांनी एकदाही त्याचे खंडन केले नाही, असेही हुडा म्हणाले. सैन्याला आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले पाहिजे आणि संरक्षण बजेट वाढवले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
सैन्यांना पंतप्रधानांनी दिली होती 'खुली छूट' - ललन सिंह
जेडीयू खासदार ललन सिंह म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी बिहारच्या मधुबनीमध्ये दहशतवादाविरोधात लढण्याचा संकल्प केला होता आणि सैन्यांना 'खुली छूट' दिली होती. ६-७ मेच्या मध्यरात्री सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले, असे त्यांनी सांगितले.
२६/११ बाबत ललन सिंह यांनी उपस्थित केले प्रश्न
ललन सिंह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत मुंबईत दहशतवादी कसे घुसले आणि यूपीएच्या (UPA) राजवटीत दहशतवाद कसा वाढला, असा प्रश्न विचारला. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या घटनेत २६ लोक मारले गेले, त्यानंतर पंतप्रधान मोदी परदेश दौरा स्थगित करून देशात परतले, असे त्यांनी नमूद केले.












Click it and Unblock the Notifications