सिंधू पाणी करार काय आहे?, आता लाखो पाकिस्तानी लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार!
Pahalgam terror attack : काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारत सरकारच्या वतीने कठोर निर्णय घेण्यात आले आहेत.
बुधवारी झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) च्या बैठकीत, 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, पाकिस्तानची जीवनवाहिणी म्हणवल्या जाणाऱ्या सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्यावर भारताचे नियंत्रण आल्याने तेथील लोक आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
21 कोटींहून अधिक लोकांना होतो या पाण्याचा फायदा
सिंधू आणि तिच्या उपनद्या चार देशांमधून वाहतात. इतकेच नाही तर 21 कोटींहून अधिक लोकसंख्येच्या पाण्याच्या गरजांची पूर्तता या नद्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानात पाणीबाणीचे संकट येणार हे काळा दगडावरील रेष आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

सिंधू पाणी करार काय आहे?
सप्टेंबर 1960 मध्ये कराची येथे तत्कालीन भारतीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानी लष्करी जनरल अयुब खान यांच्यात सिंधू पाणी करार झाला होता. 62 वर्षांपूर्वी झालेल्या सिंधू पाणी करारांतर्गत, भारताला सिंधू आणि तिच्या उपनद्यांमधून 19.5 टक्के पाणी मिळते. पाकिस्तानला सुमारे 80 टक्के पाणी मिळते.
भारत आपल्या पाण्याच्या फक्त 90 टक्के वापर करतो. 1960 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू खोऱ्याचे 6 नद्यांमध्ये विभाजन करणारा हा करार झाला. या कराराअंतर्गत, दोन्ही देशांदरम्यान दरवर्षी सिंधू जल आयोगाची बैठक घेणे बंधनकारक आहे. सिंधू पाणी कराराबाबतची शेवटची बैठक 30-31 मे 2022 रोजी नवी दिल्ली येथे झाली होती. दोन्ही देशांनी या बैठकीचे वर्णन सौहार्दपूर्ण असे केले होते.
पूर्वेकडील नद्यांवर भारताचा अधिकार..
पूर्वेकडील नद्यांवर भारताचा अधिकार आहे. तर पश्चिमेकडील नद्या पाकिस्तानला देण्यात आल्या. हा करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला. सतलज, बियास आणि रावी या तीन पूर्वेकडील नद्यांमधून मिळणाऱ्या एकूण 168 दशलक्ष एकर फूट पाण्यापैकी भारताला वार्षिक 33 दशलक्ष एकर फूट पाणी वाटप करण्यात आले आहे. भारताने वापरल्यानंतर उरलेले पाणी पाकिस्तानला जाते. तर सिंधू, झेलम आणि चिनाब सारख्या पश्चिमेकडील नद्यांचे वार्षिक सुमारे 135 दशलक्ष एकर फूट पाणी पाकिस्तानला देण्यात आले आहे.
सिंधू नदीच्या जलप्रणालीत पाच उपनद्यांचा समावेश
सिंधू नदीच्या जलप्रणालीमध्ये मुख्य नदी तसेच पाच उपनद्या समाविष्ट आहेत. या नद्या म्हणजे रावी, बियास, सतलज, झेलम आणि चिनाब. या नद्या सिंधू नदीच्या डाव्या बाजूला वाहतात. रावी, बियास आणि सतलज यांना पूर्वेकडील नद्या म्हणतात तर चिनाब, झेलम आणि सिंधू यांना पश्चिमेकडील नद्या म्हणतात. या नद्यांचे पाणी भारत आणि पाकिस्तान दोघांसाठीही महत्त्वाचे आहे.
अशा परिस्थितीत, हा करार रद्द करणे पाकिस्तानासाठी महागात पडेल. अनेक तज्ञ सिंधू पाणी कराराला ऐतिहासिक चूक मानत आहेत. भारताने ही चूक दुरुस्त करावी आणि करारात आवश्यक त्या सुधारणा कराव्यात आणि सिंधू आणि तिच्या उपनद्यांचे पाणी योग्य प्रमाणात वाटप करावे, असे ते म्हणत आहेत.
तर पाकिस्तानसाठी हा करार रद्द होणे महागात पडेल
पाकिस्तान अधूनमधून भारतावर दहशतवादी हल्ले करत राहतो. अशा परिस्थितीत रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. दोन्ही देशांमधील संबंधांना चालना मिळावी या आशेने नेहरूंनी हा करार केला. पण पाकिस्तानने प्रत्येक वेळी ही आशा धुळीस मिळवली आहे. अशा परिस्थितीत, भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा घेतलेला निर्णय पाकिस्तानसाठी एक गंभीर आणि खोल धक्का ठरणार आहे.
असा होता पाण्याचा वाद
1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर पाण्यावरून वाद सुरू झाला. 1948 मध्ये भारताने पाणीपुरवठा बंद केला. ज्यामुळे पाकिस्तानमध्ये समस्या निर्माण झाल्या. त्यानंतर कराराने पाणीपुरवठा सुरू झाला.
त्यानंतर, 1949 मध्ये, अमेरिकन तज्ज्ञ डेव्हिड लिलिएन्थल यांनी राजकीय पातळीपासून तांत्रिक आणि व्यावसायिक पातळीपर्यंत ही समस्या सोडवण्याचा सल्ला दिला.
लिलिएन्थल यांनी जागतिक बँकेकडून मदत घेण्याची शिफारसही दिली होती. त्यानंतर पुढील काळात बैठका झाल्या अन् पाणी वाटप सुरळीत झाले. पण मधल्या काळात पुन्हा पाणी वाटपावरुन वाद पाहायला देखील मिळाले.












Click it and Unblock the Notifications