धक्कादायक! जबलपूरमध्ये 5 दिवसांत 8 घोड्यांच्या संशयास्पद मृत्यू! कारण काय? 'पेटा'ची चौकशीची मागणी
MP News Suspicious deaths of 8 horses in 5 days : मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात एकापाठोपात एक अशा 8 घोड्यांचा अवघ्या पाचच दिवसांत गुढ मृत्यू झाला. धक्कादायक बातमीने देशभरातील प्राणीप्रेमींना आणि विशेषतः घोडेप्रेमींमध्ये धक्का बसला आहे. हैदराबादहून जबलपूरला 57 घोडे आणले होते, त्यातील 8 घोड्यांचा मृत्यू झाला आहे.
रिपोर्टनुसार, हे घोडे थॉरोब्रेड, मारवाडी, काठियावाडी या प्रतिष्ठित जातींचे होते. त्यांना 29 एप्रिल ते 5 मे 2025 दरम्यान जबलपूर जिल्ह्यातील पानगर भागातील रायपुरा गावात असलेल्या एका खाजगी तबेल्यात रस्तामार्गाने आणले होते, जबलपूर येथे या घोड्यांना अतिशय वाईट परिस्थितीत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हैदराबादहून आणल्यानंतर यातील अनेक घोडे आजारी पडले, त्यातील 8 घोड्यांचा 13 मे पर्यंत मृत्यू झाला.

AI generated symbolic image
मृत्यूमागे काय असू शकते कारण?
घोड्यांमध्ये पसरणारा 'ग्लँडर्स' हा एक घातक आजार या मृत्यूंमागे असू शकतो असा अधिकाऱ्यांना संशय आहे. मध्यप्रदेश पशुसंवर्धन विभागाने सर्व घोड्यांच्या रक्ताचे नमुने हरियाणातील हिस्सार येथील राष्ट्रीय घोडे संशोधन केंद्रात पाठवले आहेत. आतापर्यंत 44 घोड्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर उर्वरित घोड्यांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे.
घोड्यांची वाहतूक परवानगीशिवाय!
प्राप्त माहितीनुसार, या घोड्यांची वाहतूक निकष पाळून करण्यात आली नसल्याचे समोर येत आहे, घोडे आवश्यक वैद्यकीय परवानगी आणि आंतरराज्यीय परवान्याशिवाय वाहतूक करण्यात आले होते, यामुळे त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे शक्य नव्हते, घोड्यांच्या मृत्यूच्या पार्श्वभुमीवर भोपाळहून 3 सदस्यीय पथक 17 मे रोजी रायपुरा येथे पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. हे पथक लवकरच राज्य सरकारला घोड्यांच्या मृत्यूसंदर्भात अहवाल सादर करणार आहे.
घोड्यांच्या प्रकृतीची देखभाल करण्यासाठी पथक
जबलपूर येथे असलेल्या घोड्यांच्या प्रकृतीची देखभाल करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने जलद प्रतिसाद पथक नियु्क्त केले आहे. हैदराबादहून घोडे आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांची आणि परवानग्यांची चौकशी करण्याचे आणि निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सक्सेना यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.
प्राण्यांच्या बेकायदेशीर वाहतूकीबाबत 'पेटा'कडून चिंता
प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या PETA या संघटनेने या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. प्राण्यांची वाहतूक आणि काळजी घेण्याबाबत कठोर नियम लागू करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. जबलपूर परिसरात सक्रिय असलेल्या अनेक प्राणी संरक्षण संघटनांन मृत घोड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू शकतात असेही पेटाकडून सांगण्यात आले आहे.
केवळ क्रुरताच नाही, घोटाळा उघड होऊ शकतो?
या प्रकरणातील तपास करणाऱ्या सूत्रांनी सांगितले की, केवळ प्राण्यांवरील क्रूरतेचे हे प्रकरण नाही तर त्यातून बहुस्तरीय घोटाळ्याचे थर उघड होऊ शकतात. तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे जनतेकडून आणि न्यायव्यवस्थेकडून प्रशासन आणि पोलिसांवर दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी दबाव वाढत आहे. खेळ, मनोरंजन किंवा व्यवसायाच्या नावाखाली अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे प्राणी कल्याणकारी संघटनांचे म्हणणे आहे.












Click it and Unblock the Notifications