आज कर्नाटक बंदची हाक, काय आहे कन्नड-मराठी भाषिक समुदायांमधील वाद घ्या जाणून
Karnataka Bandh: कन्नड आणि मराठी भाषिक समुदायांमधील वाढत्या तणावाच्या कारणाने आज कर्नाटक बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद कन्नड समर्थक संघटनांनी आयोजित केला आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने कन्नड ओक्कुटा यांचा समावेश आहे. प्रामुख्याने कन्नड आणि मराठी भाषिक समुदायांमधील वाढत्या भाषिक तणावाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 12 तासांचा हा बंद पुकारण्यात आला आहे.
या बंद दरम्यान सार्वजनिक वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शाळांनी आधीच सुट्टी जाहीर केली आहे. विशेषतः राजधानी बंगळुरूमध्ये त्याचा परिणाम अधिक दिसून येण्याची अपेक्षा आहे. बंद आयोजकांकडून मॉल, मल्टिप्लेक्स आणि इतर अशा ठिकाणे बंद करण्याचे प्रयत्न देखील केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे बाजारपेठा आणि दुकाने देखील बंद ठेवले जाऊ शकतात.

कर्नाटक बंदमागील कारणे
1. बेळगावमध्ये केएसआरटीसी बस कंडक्टरवर हल्ला
या बंदचे मुख्य कारण बेळगावमध्ये कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बस कंडक्टरवर मराठी समर्थकांनी केलेला हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये घडलेल्या या घटनेचे मुख्य कारण म्हणजे बस कंडक्टर मराठी भाषा बोलत नव्हता. या हल्ल्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये भाषिक वाद आणखी चिघळला आहे.
2. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद आणि भाषिक तणाव
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद हा दशकांपूर्वीचा आहे. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्राने 865 गावांवर (कर्नाटकातील बेळगाव, कारवार आणि निपाणीसह) दावा केला आहे.
महाराष्ट्रातील संघटाना आणि लोकांचे म्हणणे आहे की या भागात मोठ्या संख्येने मराठी भाषिक लोक राहतात म्हणून त्यांचा महाराष्ट्रात समावेश करावा. तथापि, कर्नाटक सरकारने ते सातत्याने नाकारले आहे. हे प्रकरण जवळजवळ दोन दशकांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
वादाचे केंद्रबिंदू राहिलेल्या बेळगावमध्ये मराठी आणि कन्नड भाषिक लोकसंख्येमध्ये बराच काळ तणाव आहे. या कारणास्तव कर्नाटकने तेथे विधानसभेची स्थापना केली आहे आणि तेथे अधिवेशने देखील घेतलं जातं.
3. ग्रेटर बेंगळुरू गव्हर्नन्स बिलाला विरोध
या बंदचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ग्रेटर बंगळुरू गव्हर्नन्स बिलाला होणारा निषेध. या प्रस्तावित विधेयकानुसार बेंगळुरूला अनेक प्रशासकीय झोनमध्ये विभागले जाणार आहे. कन्नड समर्थक संघटनांचा असा विश्वास आहे की, याचा कन्नड संस्कृती आणि भाषेवर नकारात्मक परिणाम होईल.
कर्नाटक बंदच्या आयोजकांच्या मागण्या?
1. मराठी संघटनांवर बंदी: आयोजकांची मुख्य मागणी अशी आहे की महाराष्ट्र एकीकरण समिती (MES) सारख्या मराठी संघटनांवर कर्नाटकात बंदी घालावी. या संघटना राज्यात भाषिक तणाव निर्माण करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
2. कन्नड भाषिक लोकांचे संरक्षण: विशेषतः बेळगावीसारख्या सीमावर्ती भागात कन्नड भाषिक लोकसंख्येच्या संरक्षणाची मागणी आहे.
3. बंगळुरूच्या प्रशासकीय विभाजनाला विरोध: आयोजकांचा असा विश्वास आहे की बेंगळुरूचे अनेक प्रशासकीय प्रदेशांमध्ये विभाजन केल्याने कन्नड ओळख आणि संस्कृती कमकुवत होईल, म्हणून ते त्याला तीव्र विरोध करत आहेत.
कर्नाटक बंदचा काय परिणाम होऊ शकतो?
या बंदमुळे कर्नाटकातील अनेक भागात सामान्य जनजीवन विस्कळीत होऊ शकते. वाहतूक सेवा, व्यवसाय, शाळा आणि महाविद्यालये बंद राहण्याची शक्यता आहे. या बंदमुळे प्रवाशांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.












Click it and Unblock the Notifications