भारत-अमेरिकेतील व्यापार करारामुळे रशियाकडून तेल खरेदी थांबवणार का?, मंत्री गोयल म्हणाले...
Piyush Goyal on India-US Trade Deal : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यामुळे सध्या भारत-अमेरिका व्यापार करार आणि रशियाकडून केली जाणारी तेल खरेदी हे दोन विषय जागतिक राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली असून, विशेषतः भारतीय शेतकरी आणि व्यापार क्षेत्राचे हित कसे जपले गेले आहे, यावर प्रकाश टाकला आहे.

रशियाकडून तेल खरेदी थांबवणार का?
डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे असा दावा केला होता की, अमेरिकेशी झालेल्या व्यापार करारानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल. या संवेदनशील प्रश्नावर थेट भाष्य करणे टाळत पीयूष गोयल म्हणाले की, "या विषयावर परराष्ट्र मंत्रालय योग्य वेळी चर्चा करेल."
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आपल्या ऊर्जा गरजा आणि नागरिकांचे हित लक्षात घेऊनच निर्णय घेणार आहे. ज्या संस्थांवर निर्बंध नाहीत आणि जेथून किफायतशीर दरात तेल उपलब्ध होईल, अशा जागतिक बाजारपेठेतून भारत तेल खरेदी सुरू ठेवण्याची शक्यता आहे.
अमेरिकन शुल्क आणि भारताची सवलत
पीयूष गोयल यांनी अमेरिकेकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, अमेरिका आपल्या शेजारील आणि इतर प्रतिस्पर्धी देशांवर मोठ्या प्रमाणावर कर लादते. उदाहरणच द्यायचे झाले तर, चीन: ३५% शुल्क, व्हिएतनाम आणि बांगलादेश: २०% शुल्क, इंडोनेशिया: १९% शुल्क. याउलट, भारताला अमेरिकन अर्थव्यवस्थेत इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी शुल्काचा सामना करावा लागत आहे. विशेषतः स्मार्टफोनसारख्या वस्तूंवर भारतीय निर्यातदारांना कोणतेही शुल्क न भरता अमेरिकेत माल पाठवता येणार आहे.
शेतकऱ्यांचे कवच: काय वगळले, काय जपले?
विरोधी पक्षांच्या टीकेला उत्तर देताना पियूष गोयल यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, ज्या उत्पादनांमध्ये भारत आधीच स्वयंपूर्ण आहे, त्यांना या कराराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. खालील उत्पादने कमी दरात भारतात येऊ दिली जाणार नाहीत, जेणेकरून स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. ज्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे,
- धान्य : तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, मका.
- डेअरी आणि मांस : दुग्धजन्य पदार्थ, कुक्कुटपालन, मांस.
- फळे : केळी, स्ट्रॉबेरी, चेरी आणि लिंबूवर्गीय फळे.
- इतर : इथेनॉल, तंबाखू, अल्कोहोल नसलेली पेये, स्टार्च.
याउलट, भारतीय शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मसाले, चहा, कॉफी, नारळ तेल, काजू अन् अनेक भाज्या यांवर अमेरिकेत निर्यात करताना 'शून्य' शुल्क आकारले जाईल.
विरोधकांवर टीका आणि कराराचे स्वागत!
"देशातील काही घटक शेतकरीविरोधी असून ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत," असा आरोप गोयल यांनी यावेळी केला. हा करार संसदेत वाचून दाखवण्यापेक्षा तो थेट जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या व्यापार करारामुळे देशातील सर्व क्षेत्रांमध्ये उत्साहाचे वातावरण असून हा भारताच्या प्रगतीसाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Click it and Unblock the Notifications
