भारत-कॅनडामध्ये 'ऊर्जा' क्रांती! गोव्यात करारावर स्वाक्षरी; 500अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचा मार्ग मोकळा!
India Canada energy partnership : जागतिक भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील द्विपक्षीय संबंधांना आता 'ऊर्जे'ची नवी झळाळी मिळाली आहे. गोव्यात सुरू असलेल्या 'इंडिया एनर्जी वीक 2026' (IEW 2026) दरम्यान दोन्ही देशांनी एका धोरणात्मक संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे केवळ ऊर्जा सुरक्षाच बळकट होणार नाही, तर स्वच्छ ऊर्जा संक्रमणाच्या (Clean Energy Transition) प्रवासात दोन्ही देश एकमेकांचे प्रमुख भागीदार बनले आहेत.

मंत्रीस्तरीय संवादाला नव्याने सुरुवात
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी आणि कॅनडाचे ऊर्जा मंत्री टिमोथी हॉजसन यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
भारत ऊर्जा सप्ताहात कॅनेडियन कॅबिनेट मंत्र्यांचा हा पहिलाच सहभाग आहे. जून २०२५ मध्ये कॅनडातील कनानास्किस येथे पंतप्रधान मोदी आणि कॅनेडियन पंतप्रधान यांच्यात झालेल्या चर्चेला या करारामुळे मूर्त रूप मिळाले आहे. ऊर्जा क्षेत्रातील दोन महाशक्ती एकत्र आल्याने पूरक ताकद निर्माण होईल. या भागीदारीचा पाया दोन्ही देशांच्या ऊर्जा क्षेत्रातील नैसर्गिक पूरकतेवर आधारलेला आहे.
- वैशिष्ट्ये : भारत (जगातील ३ रा मोठा ग्राहक) : कॅनडा (जागतिक ऊर्जा पॉवरहाऊस)
- भूमिका : पुढील दोन दशकांत जगातील १/३ ऊर्जा मागणी वाढीचा वाटा : वाढती एलएनजी क्षमता आणि टीएमएक्स पाइपलाइनद्वारे कच्च्या तेलाची निर्यात.
- क्षमता : ५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक क्षमता आणि मोठे रिफायनिंग हब : ११६ अब्ज डॉलर्सच्या ऊर्जा प्रकल्पांचा जलद मार्ग.
- व्यापार : कॅनडाला शुद्ध पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात करणार | भारताला एलएनजी, एलपीजी आणि कच्च्या तेलाचा पुरवठा करणार.
क्लीन टेक आणि हवामान कृतीवर भर
केवळ पारंपारिक इंधनच नव्हे, तर 'नेट झिरो' उद्दिष्टाकडे वाटचाल करण्यासाठी दोन्ही देशांनी भविष्यातील तंत्रज्ञानावर सहकार्य करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील क्षेत्रांचा समावेश आहे:
CCUS तंत्रज्ञान : कार्बन कॅप्चर आणि साठवणुकीवर संयुक्त संशोधन.
ग्रीन हायड्रोजन आणि जैवइंधन : शाश्वत विमान इंधन (SAF) आणि जागतिक जैवइंधन अलायन्समध्ये सहकार्य.
महत्त्वपूर्ण खनिजे : बॅटरी स्टोरेज आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या खनिजांची पुरवठा साखळी लवचिक बनवणे.
AI चा वापर : ऊर्जा उत्पादनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कार्यक्षमता वाढवणे.
गुंतवणूक आणि धोरणात्मक सुधारणा
कॅनडाने आपल्या देशात ऊर्जा प्रकल्पांसाठी स्थापन केलेल्या 'प्रमुख प्रकल्प कार्यालया'ची माहिती दिली, ज्यामुळे गुंतवणूकदारांना जलद परवानग्या मिळतील.
भारतानेही आपल्या ५०० अब्ज डॉलर्सच्या ऊर्जा मूल्य साखळीतील संधी अधोरेखित केल्या. दोन्ही मंत्र्यांनी भारतीय आणि कॅनेडियन कंपन्यांमधील Business-to-Business (B2B) भागीदारीला प्रोत्साहन देण्यावर शिक्कामोर्तब केले.












Click it and Unblock the Notifications