प्रजासत्ताक दिनाला भाषण करायचंय? टाळ्या मिळवायच्या? तर करा हे सर्वात सोप्पे भाषण
यंदा आपण सर्व भारतीय ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. सर्वजण या दिवशी आनंदात असतात. सगळ्यात जास्त आनंद होतो तो चिमुकल्याना. शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. शिवाय प्रभातफेरीही असते. झेंडावंदन, भाषण हे सगळं विद्यार्थीदशेत फार आवडत असतं. आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या भाषणाबाबतच माहिती करुन घेणार आहोत. लहानग्यांना या दिवशी काय आणि कसं भाषण करायचं, हा प्रश्न असतो. आज आपण प्रजासत्ताक दिनाचे सर्वात सोप्पे आणि टाळ्या मिळवणारे भाषण पाहूयात...

कशी कराल सुरुवात?
स्टेजवर अगदी बेधडक जा. तुमच्यातला आत्मविश्वास कुठेही ढळू देऊ नका. समोर बसलेल्या सगळ्यांच्या नजरेला नजर देत आपल्या भाषणाची सुरुवात करा. भाषणापूर्वी स्टेजवरचा माईक हा तुमच्या उंचीनुसार योग्य पद्धतीने सेट केलेला आहे की नाही, त्याची खात्री करा. त्यानंतर तुमचे भाषण सुरु करा.
कसं द्यायचं भाषण?
आदरणीय अतिथी, मुख्यध्यापक, शिक्षक व जमलेल्या सर्व मित्र मैत्रिणींना नमस्कार. मित्रांनो आज आपण येथे भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. प्रतिवर्ष 26 जानेवारीला साजरा केला जाणारा प्रजासत्ताक दिन, भारताचा राष्ट्रीय उत्सव आहे. प्रत्यक भारतीय या सणाला पूर्ण जोश, उत्साह आणि सम्मानाने साजरा करतो. भारतात 26 जानेवारी 1950 या दिवशी संविधान लागू करण्यात आलं. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालं. पण स्वातंत्र्यानंतर देशातल्या सगळ्या लोकांना एकत्र आणणारं संविधान आपल्याकडे नव्हतं. त्यामुळे संविधान सभा स्थापन करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताचं संविधान तयार करण्यात आलं.
संविधानाचं महत्त्व काय?
फक्त संविधान लागू होण्याचा दिवस एवढ्यापुरतंच या दिवसाचं महत्त्व नाही. संविधानात समाविष्ट असलेली कर्तव्ये आणि अधिकार याचाही विचार आपण करायला हवा. देशाच्या आत्मनिर्भरतेबद्दलची, स्वातंत्र्याबद्दलची आणि लोकशाहीबद्दलची आपली एक बांधिलकी आहे. हा दिवस त्याचे प्रतीक आहे. भारतीय संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानामुळे देशाच्या प्रत्येक नागरिकाला समानतेचा, स्वातंत्र्याचा आणि न्यायाचा हक्क मिळाला आहे. इथे शेकडो भाषा आणि बोलीभाषा बोलल्या जातात. इथल्या संस्कृती, परंपरेतही वैविध्य आहे. पण संविधान आपल्याला जात, धर्म, लिंग आणि भाषेच्या आधारावर कोणताही भेदभाव न करण्याचा सल्ला देते.
करा योग्य समारोप
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊन गेली. मात्र आजही अनेक आव्हाने आहेत. दारिद्र्य, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारासारख्या समस्या भारताच्या विकासाच्या मार्गातले मोठे अडथळे आहेत. पण प्रत्येक समस्येवर मात करणं शक्य आहे, हे आपण विसरता कामा नये. एकत्र येऊन प्रयत्न केला तर सगळं काही शक्य आहे. प्रत्येक नागरिकाने आपली कर्तव्ये व्यवस्थित पार पाडली तर भारत कायम एक शक्तिशाली देश बनून जगासमोर उभा राहील. जय हिंद ! जय भारत !












Click it and Unblock the Notifications