Dhulivandan 2025 : महाराष्ट्रातील या गावात लाकडांची होळी पेटत नाही; रंग ही खेळला जात नाही, कारण काय?
Dhulivandan 2025 : होळीचे महत्व काय..हे कुणाला सांगायची गरज नाही. होळी सण हा बालपणापासून परंपरा आणि संस्कृतीचे धडे देतो, सारा देश होळी सण साजरा करतो. या दिवशी प्रचंड उल्हास आणि आनंददायी वातावरण असते. या दिवशी पुरण पोळीचा होळीला नैवेद्य दाखवून होळीचा सण साजरा केला जातो. त्यानंतर रंगही खेळला जातो.
होळीच्या रंगात न्हावून निघायला कुणाला आवडणार नाही. हा रंगच असा की, त्यात उत्सवावेळी देहभान विसरुन जाते, पण कदाचित तुम्हाला माहित नसेल की, महाराष्ट्रातील असे एक गाव आहे, त्या गावात लाकडाची होळी पेटवली जात नाही. एवढेच नाहीतर होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनावेळी रंग खेळला जात नाही.

महाराष्ट्रातील ते कोणते गाव जिथे होळी पेटत नाही
होळी आणि होळीच्या दुसरा दिवशी देशात मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या रंगांची उधळण करतात. परंतु,भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावातील नागरिक मागील 33 वर्षांपासून होळी व रंगाची उधळण करीत नाही. मात्र रंगाचा सण भक्तिरंगात रंगून साजरा करीत असतात. भंडारा जिल्हात होळी व रंग न खेळणारे गाव म्हणून गवराळा गावाला ओळखले जाते.
गावात का खेळली जात नाही होळी
गावात किसनबाबा अवसरे महाराज यांचे वास्तव्य होते. ते मुळचे चंद्रपुर जिल्ह्यातील बेलगाव येथील रहिवासी होते. ते व्यवसायाने गवंडी होते. गवराळा येथील हनुमान मंदिरात राहत असत. त्यांनी श्रमदानातून स्वच्छता मोहीम आणि या परिसरातील अनेक गावांमध्ये मंदिराचे बांधकाम केले. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि धार्मिक वृत्तीमुळे ते परिसरात प्रसिद्ध होते. अशा या श्रमप्रतीष्ठेला चालणा देणाऱ्या कर्मयोगी किसनबाबांचे 19 मार्च 1992 रोजी निधन झाले. त्यांचा स्वर्गवास झाला तो दिवस होळीचा होता. त्यावेळी त्यांच्या निधनाने संपुर्ण परिसर शोकसागरात बुडाला अन् तेव्हापासुनच गवराळा वासीयांनी होळी साजरी न करण़्याचा संकल्प घेतला आहे.
केरकचऱ्याची होळी पेटते
हिंदू धर्मात होळीच्या सणाला वेगळेच महत्त्व आहे. होळीच्या दिवशी पुरणपोळी,साखरेची गोड गाठी आणि धूलिवंदनाच्या दिवशी एकमेकांवर रंगांची उधळण करून सर्वजण मौजमजा करतात.परंतु, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील गवराळा हे गाव जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये सर्वांनाच अपवाद ठरले आहे.
गवराळा गावात होळीच्या दिवशी कर्मयोगी अनासक्त ब्रह्मलीन किसनबाबा अवसरे पुण्यतिथी महोत्सव तर रंगपंचमीच्या दिवशी गोपालकाला आयोजित केला जातो. गावात आजही होळी जाळली जात नाही. परंतु,लाकडांची होळी पेटत नाही तर ग्रामसफाई करून गोळा केलेल्या केरकचऱ्याची होळी पेटते. गावातील कचऱ्यासोबत वाईट विचारसुद्धा येथील गावकऱ्यांनी जाळले आहेत असे गावकऱ्याचे मत आहे.












Click it and Unblock the Notifications