केरळनंतर आता दिल्लीचे नाव बदलून इंद्रप्रस्थ करा! भाजप नेत्याकडून हालचाल; इंद्रप्रस्थच नाव का? वाचा
Bjp mp praveen khandelwal letter to amit shah rename delhi : भारताची राजधानी 'दिल्ली'चे नाव बदलून आता 'इंद्रप्रस्थ' करावे, अशी मोठी मागणी भाजप खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून दिल्लीच्या प्राचीन आणि सांस्कृतिक वारशाची पुनर्स्थापना करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे.

खासदार खंडेलवाल यांच्या पत्रातील प्रमुख मुद्दे
१. ऐतिहासिक वारसा
'दिल्ली' हे नाव मध्ययुगीन काळात प्रचलित झाले असून ते शहराच्या मर्यादित इतिहासाचे प्रतिनिधित्व करते. याउलट, इंद्रप्रस्थ हे नाव भारताच्या प्राचीन संस्कृतीशी आणि महाभारतातील पांडवांशी जोडलेले आहे.
२. सांस्कृतिक ओळख
दिल्लीचे नाव बदलून इंद्रप्रस्थ केल्यास आधुनिक भारताची राजधानी तिच्या प्राचीन पायाशी पुन्हा जोडली जाईल. हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रतीक ठरेल, जे मानवजातीच्या सर्वात जुन्या सांस्कृतिक परंपरांपैकी एकावर उभे आहे.
३. पुराव्यांचा आधार
पुराण किल्ला येथील पुरातत्व उत्खननात सापडलेले पुरावे आणि ऐतिहासिक साहित्य हे सिद्ध करतात की, आजची दिल्ली हेच प्राचीन इंद्रप्रस्थ आहे.
BJP MP Praveen Khandelwal writes a letter to Union Home Minister Amit Shah requesting the renaming of Delhi as Indraprastha
— ANI (@ANI) February 25, 2026
"...As such, the name "Delhi" reflects a limited historical period rather than the deeper and more enduring legacy of the city. Restoring the name… pic.twitter.com/meJBqxPS9A
इतर शहरांचा दाखला
भारताने आधीच मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि प्रयागराज यांसारख्या शहरांची नावे बदलून त्यांचा ऐतिहासिक वारसा पुन्हा प्रस्थापित केला आहे, असेही खंडेलवाल यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
पुढील पाऊल काय?
प्रवीण खंडेलवाल यांनी गृह मंत्रालयाला विनंती केली आहे की, इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतर भागधारकांशी चर्चा करून दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ करण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू करावी. आता या मागणीवर केंद्र सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इंद्रप्रस्थाचा रंजक इतिहास काय?
१. पांडवांची राजधानी
महाभारतानुसार, जेव्हा धृतराष्ट्राने पांडवांना खांडवप्रस्थ नावाचे ओसाड अरण्य दिले, तेव्हा पांडवांनी तिथे आपल्या पराक्रमाने आणि मयासुराच्या मदतीने एका भव्य नगराची निर्मिती केली. हेच नगर पुढे 'इंद्रप्रस्थ' म्हणून ओळखले जाऊ लागले. हे नगर इतके वैभवशाली होते की त्याला 'इंद्राची नगरी' असे म्हटले जाई.
२. दिल्लीचा 'पुराणा किल्ला'
पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते, दिल्लीतील यमुना नदीच्या काठावर असलेला 'पुराणा किल्ला' हाच प्राचीन इंद्रप्रस्थाचा केंद्रबिंदू असावा. या ठिकाणी झालेल्या उत्खननात मौर्य आणि गुप्त काळाच्याही आधीचे राखाडी रंगाची मातीची भांडी (Painted Grey Ware) सापडली आहेत, जी साधारणपणे महाभारत काळाशी जोडली जातात.
३. नावाचा प्रवास
- इंद्रप्रस्थ (प्राचीन): महाभारत काळात वैभवशाली राजधानी.
- ढिल्लिका (मध्ययुगीन): साधारणपणे ७३६ मध्ये तोमर वंशाच्या अनंगपाल राजाने 'ढिल्लिका' (Delhi) हे शहर वसवले, असे मानले जाते.
- शहाजहानाबाद (मुघल): मुघल काळात शहाजहानने नवीन शहर वसवून आपली राजधानी तिथे हलवली.
- नवी दिल्ली (ब्रिटिश): १९११ मध्ये ब्रिटिशांनी कोलकात्याहून आपली राजधानी दिल्लीत हलवली आणि 'ल्युटियन्स दिल्ली'ची निर्मिती केली.
४. नावाच्या मागणीमागील कारण काय?
भाजप खासदारांच्या मते, 'दिल्ली' हे नाव एका विशिष्ट कालखंडाचे (मुघल आणि ब्रिटिश) प्रतिनिधित्व करते. जर नाव 'इंद्रप्रस्थ' केले, तर ते भारताच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीचे आणि 'भारताचा आत्मा' असलेल्या महाकाव्यांचे पुनरुज्जीवन करेल.












Click it and Unblock the Notifications