संयुक्त महाराष्ट्र लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं समर्थन होतं का; मुंबईबाबत काय मत होतं? वाचा
Ambedkar jayanti 2025 : महाराष्ट्र राज्य व्हावं यासाठी 106 हुतात्मांनी रक्त सांडलं. अथक परिश्रम आणि दिर्घकालीन लढ्यानंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, पण त्याआधी काँग्रेसच्या मूळ धोरणानुसार, स्वातंत्र्यपूर्व काळात भाषावार प्रांतनिर्मितीचे वचन देण्यात आलं होतं. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. यानंतर देशात भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा पुन्हा जोर धरु लागला. भारताच्या विविध भागातून भाषावार प्रांतरचनेची मागणी वाढत होती. इकडे महाराष्ट्रातही मुंबई बेळगाव, कारवार,धाडवाडसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा ही मागणी जोर धरु लागली.

अवघे मराठी जण पेटून उठले आणि संयुक्त महाराष्ट्रचं आंदोलन उभं राहीलं. या आंदोलनाला उग्र स्वरुप प्राप्त झालं. १९५४ साली फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली. या अहवालात महाराष्ट्राशी दुजाभाव करण्यात आला होता.याचवेळी काही लोकांकडून भाषावार प्रांतरचना होताना मुंबई गुजरातला मिळावी असा घाट घातला जात होता. त्यामुळे मराठी जणांमध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून तोडत असल्याची भावना जोर धरु लागली होती. याचा उद्रेक होऊन होऊन महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा मोठा उद्रेक पेटला.
मराठी माणसाच्या एकजुटीला यश आलं. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. पण हे काही सहज झालं नाही. यासाठी १०६ हुतात्म्यांनी आपल्या जीवाची अहुती दिली होती. स्वातंत्र्य चळवळीनंतर हे देशातील सर्वात मोठं आंदोलन होतं. संयुक्त महाराष्ट्र तसंच महाराष्ट्रासाठीचं योगदान यावर चर्चा करताना अनेकांची चर्चा होते. मात्र एक नाव असं होतं ज्यांचा महाराष्ट्रासाठीच्या योगदानाचा उल्लेख पाहीजे तेवढा केला गेला नाही. ते नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आपण त्यांचं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राविषयी मत काय होतं. तसंच यासाठी त्यांचं योगदान काय, याबाबत आपण या वृत्तात जाणून घेणार आहोत.
मुंबई महाराष्ट्राचीच - बाबासाहेबांनी केलं होतं जोरदार समर्थन
मुंबई, बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी अनेकांनी आपलं योगदान दिलं. अनेक लेखक, कवी, शाहीर, कलाकार, नेते यांनी योगदान दिलं. एवढचं काय तर समस्त मराठी जणांनी या आंदोलनात अगदी चिवट लढा दिला. तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. या आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील एक भूमिका बजावली होती. ही भूमिका इतर आंदोलकांपेक्षा वेगळी होती.देशभरातून भाषावार प्रांतरचनेची मागणी सुरु झाल्यानंतर काँग्रेसने १९४८ साली धार कमिशची स्थापना केली होती. अलहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत् न्यामुर्ती एस, के. धार यांच्या अध्य़क्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. या आयोगापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'महाराष्ट्र अॅज ए लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्स' या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तुलनात्मक आकडेवारीसह एक निवेदन सादर केलं होतं.. या निवेदनात त्यांनी मुंबई महाराष्ट्राची आहे, याचं जोरदाररणे समर्थन केलं होतं.
बाबासाहेब म्हणाले होते.. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करु नये
भाषावार प्रांतरचनेची मागणी मान्य केल्यास मुंबई शहर महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्यामुळे ते महाराष्ट्रापासून वेगळे करू नये, असं बाबासाहेबांनी या निवेदनात स्पष्ट नमूद केलं होतं. खरं तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची ही एकप्रकारे अधिकृत सुरुवातच म्हणतात येईल. १० डिसेंबर १९४८ रोजी या कमिशनने एक अहवाल सादर केला. यात त्यांनी भाषावार प्रांतरचनेला नकार दिला. तसंच भौगोलिक सलगता, आर्थिक सक्षमता व प्रशासकिय सोयीच्या आधारे प्रांत रचना करण्यात यावी अशी शिफारस केली. त्यानंतर दार कमिशनचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने जेपीव्ही कमिशन स्थापन केले. या कमिशनमध्ये खुद्द देशाचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष पट्टाभी सितारमय्या अशा दिग्गजांचा समावेश होता. या कमिशनने धार कमिशनच्या अहवालाचा अभ्यास करुन सध्याची वेळ भाषावार प्रांतरचनेस योग्य नसल्याचा निष्कर्ष काढला. यानंतर उद्रेक वाढल्यानंतर 1954 साली फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली..
मुंबईबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नेमकं मत काय होतं?
भाषावार प्रांतरचना झाल्यास मुंबई ही महाराष्ट्राला न मिळता गुजरातला मिळावी, असा घाट काही नेत्यांनी घातला होता. हा डाव वेळीच ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याला तीव्र विरोध केला होता..मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं कृत्यू निषेधार्थ आहे. मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. भौगोलिक, ऐतिहासिक तसंच सांस्कृतिकदृष्ट्या मुंबईला महाराष्ट्रापासून विलग करण्याचं कोणतंही षडयंत्र खपवून घेतलं जाणार नाही. तसंच ही कृती न्यायाला धरुनदेखील होणार नाही, असे खडेबोल बाबासाहेबांनी सुनावले होते.
खरं बघायला गेलं तर संयुक्त महाराष्ट्राचा लढा जोर धरण्यापूर्वीत बाबासाहेबांनी मुंबई महाराष्ट्राला मिळावी याबाबत लिखाण करुन ठेवलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना व्हावी, असा अहवाल सादर केल्यानंतर काही तत्कालीन इंग्रजी वर्तमान पत्रात मुंबई गुजरातला जोडावी म्हणून लेखन केलं गेलं. या कुटील डावालादेखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या वकिली प्रत्युत्तराने खोडून काढत..महाराष्ट्राचं स्वतंत्र्य राज्य निर्माण न होण्यामागे मुंबई हे महत्वाचे कारण होतं. काही परप्रांतीय व्यापारी आणि भांडवलदारांचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता. मुंबई गुजरातच्या ताब्यात न गेल्यास मुंबईला केंद्राशासीत करावं, असाही काही नेत्यांचा मनसुबा होता.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला होता बाबासाहेबांचा पाठिंबा
प्रबुद्ध भारतमधील वृत्तानुसार, संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरु होण्यापूर्वी सयुंक्त महाराष्ट्र समितीचे नेते कॉम्रेड डांगे, एस.एस. जोशी, आचार्य अत्रे यांनी बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती.या भेटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठींबा दिला होता. त्यानंतर बाबासाहेब मुंबईत परतल्यानंतर राजगृह या बाबासाहेबांच्या निवासस्थानी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांच्या बैठका पार पडत, एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे यांच्यासह समितीमधील विविध नेतेमंडळी या बैठकांना हजर असत.असंही या वृत्तात म्हटलं आहे.
..म्हणून बाबासाहेबांनी मराठीतून वृत्तपत्रे काढली
बाबासाहेबांना मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांच्या कर्तबगारीवर पूर्ण विश्वास होता.. कर्तव्याची जाणीव, प्रामाणिकपणा आणि राष्ट्राच्या हिताची दृष्टी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. असं बाबासाहेब नेहमी म्हणत. मराठी माणसाचा विकास व्हावा. त्याची जनजागृती व्हावी, यासाठी बाबासाहेबांनी मराठीतून वृत्तपत्रे काढली. यासाठी बाबासाहेबांनी मराठी भाषेचाही गाढा अभ्यास केला. महाराष्ट्राची परंपरा टिकवायची असेल, तर मराठी माणसाने विद्याव्यासंग सोडता कामा नये, त्यामुळे आपण आपली परंपरा टिकवू शकू, आपल्यात प्रामाणिकपणा आणि कर्तव्याची जाणीव असावी. त्यामुळे राष्ट्रीय हिताची दृष्टी ही परंपरा आपण राखू शकू, असं बाबासाहेबांचं मराठी माणसाबदद्दल मत होतं..












Click it and Unblock the Notifications