तरुण संशोधकांच्या पंखांना बळ; अदानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'IRIS राष्ट्रीय मेळा' उत्साहात संपन्न
AIS Hosts IRIS National Fair 2025-26 : भारताच्या कानाकोपऱ्यातील तरुण बुद्धिमत्तेला वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोनाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, अदानी इंटरनॅशनल स्कूल (एडीआयएस), शांतीग्राम येथे 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान 'आयआरआयएस (IRIS) राष्ट्रीय मेळा 2025-26 (कोहोर्ट 2)' चे शानदार आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय कार्यक्रमाने अहमदाबादला विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रातील शालेय संशोधनाचे एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून सिद्ध केले आहे.

देशभरातील प्रतिभेचा संगम
या राष्ट्रीय स्तरावरील मेळ्यात भारताच्या 12 राज्यांतील 24 शहरांमधून 75 विद्यार्थी नवोन्मेषकांनी सहभाग घेतला होता. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता, चौकशी-आधारित शिक्षण आणि खऱ्या जगातील समस्यांवर उपाय शोधण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी त्यांचे मूळ संशोधन प्रकल्प येथे सादर केले. शिक्षक, संशोधक आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वर्गाच्या मर्यादा ओलांडून विज्ञानातील प्रयोगांचे सादरीकरण केले.
महत्त्वाचे उपक्रम आणि मार्गदर्शन
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक आणि शिक्षक परिषदेने झाली. यामध्ये अहमदाबादमधील विविध शाळांच्या प्रमुखांनी एकत्र येऊन 'अनुभवात्मक शिक्षण' आणि 'STEM' शिक्षणाचे महत्त्व यावर सखोल चर्चा केली. ७ फेब्रुवारी रोजी या मेळ्याचे औपचारिक उद्घाटन झाले, जे आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि अभियांत्रिकी मेळा (ISEF) २०२६ साठी पात्रता व्यासपीठ म्हणून महत्त्वाचे ठरले.
मान्यवरांचे विचार: नवोपक्रमाची गरज
या कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला गुजरातच्या शिक्षण राज्यमंत्री रिवाबा रवींद्रसिंह जडेजा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020चा संदर्भ देत विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीच्या काळातच संशोधन वृत्ती रुजवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
"शाळांनी केवळ माहिती देण्याचे काम न करता कुतूहल, प्रयोग आणि वैज्ञानिक विचारसरणी वाढवणारी जागा म्हणून काम केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुरुवातीच्या टप्प्यातच प्रश्न विचारायला, उपायांची चाचणी घ्यायला आणि अपयशातून शिकायला हवे," असे मत श्रीमती जडेजा यांनी व्यक्त केले.
तसेच, अदानी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रवर्तक आणि अदानी ग्रुपच्या गैर-कार्यकारी संचालक नम्रता अदानी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, "आयआरआयएस सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन वास्तविक जगातील आव्हानांवर संशोधनाद्वारे काम करण्याची संधी मिळते."
यशाची शिखरे आणि पदकांची कमाई
या स्पर्धेचा निकाल अत्यंत चुरशीचा ठरला. तज्ज्ञांच्या कठोर मूल्यमापन प्रक्रियेनंतर, १५ सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली, १० रौप्य पदके देऊन विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा गौरव करण्यात आला. हे सुवर्ण पदक विजेते आता जागतिक स्तरावरील विज्ञान स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अंतिम निवड फेरीत प्रवेश करणार आहेत.
अदानी इंटरनॅशनल स्कूलची भूमिका
या मेळ्याच्या यशस्वी आयोजनामुळे अदानी इंटरनॅशनल स्कूलचे सर्वांगीण शिक्षणाप्रती असलेले समर्पण पुन्हा एकदा दिसून आले. अदानी समूहाच्या इंटरनॅशनल एनर्जी बिझनेसचे सीईओ अमित सिंग यांच्यासह अनेक वरिष्ठ प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. क्रीडा, कला आणि नेतृत्वाच्या विकासासोबतच STEM संशोधनाला प्रोत्साहन देऊन जागतिक दर्जाचे नागरिक घडवणे, हे शाळेचे मुख्य उद्दिष्ट या निमित्ताने स्पष्ट झाले.
काय आहे IRIS?
'आयआरआयएस' (IRIS) हा एक्सटेम्पलर एज्युकेशन लिंकर्स फाउंडेशनचा एक उपक्रम आहे. पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची गोडी निर्माण करणे आणि त्यांना ISEF सारख्या जागतिक व्यासपीठावर नेणे, हा या फाउंडेशनचा मुख्य हेतू आहे.












Click it and Unblock the Notifications