'सायलेंट किलर' स्वादुपिंडाचा कर्करोग! 'ही' 6 सौम्य लक्षणं चुकूनही दुर्लक्षित करू नका!
Pancreatic cancer early signs in marathi : दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील तिसरा गुरुवार 'जागतिक स्वादुपिंड कर्करोग दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिन नुकताच झाला, पण केवळ अशा दिवसांच्याच काळात कर्करोगाबद्दल जाणीव जागृती नको तर प्रत्येक दिवस हा जाणीव जागृतीचा असावा. स्वादुपिंडाचा कर्करोग हा एक अत्यंत धोकादायक कर्करोग मानला जातो, ज्याला वैद्यकीय क्षेत्रात 'सायलेंट किलर' असे म्हटले जाते. कारण, या आजाराची सुरुवातीची लक्षणे खूप सौम्य आणि सामान्य असतात, ज्यामुळे रुग्ण अनेकदा ती दुर्लक्षित करतात. त्यामुळे बहुतेक प्रकरणांमध्ये कर्करोगाचे निदान तेव्हा होते, जेव्हा तो गंभीर अवस्थेत पोहोचलेला असतो.

छोट्या आतड्याजवळ असलेले स्वादुपिंड (Pancreas) पचन आणि इन्सुलिन निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. पुणे येथील सल्लागार गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट, डॉ. अमोल दहाले यांच्याकडून जाणून घेऊया या कर्करोगाची कारणे, धोक्याची लक्षणे आणि बचावाचे उपाय.
स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजे काय आणि त्याची कारणे काय?
स्वादुपिंडाच्या पेशींची असामान्य वाढ होऊन गाठ (ट्यूमर) तयार होते, तेव्हा हा कर्करोग होतो. याचा सर्वात मोठे कारण म्हणजे क्रॉनिक पॅन्क्रियाटायटिस म्हणजेच स्वादुपिंडात दीर्घकाळ राहणारी सूज.
प्रमुख कारणे (Causes)
- दीर्घकाळ चालणारा क्रॉनिक पॅन्क्रियाटायटिस.
- धूम्रपान आणि जास्त मद्यपान.
- कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असणे (Family History).
- लठ्ठपणा (Obesity) आणि शारीरिक निष्क्रियता.
- वाढते वय.
'ही' ६ सौम्य लक्षणे दुर्लक्ष करू नका!
स्वादुपिंडाचा कर्करोग हा सायलेंट किलर असल्याने, खालीलपैकी कोणतीही लक्षणे दीर्घकाळ जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
- पोटाच्या वरच्या भागात सतत हलके दुखणे: किंवा पचनाच्या समस्या वारंवार जाणवणे.
- कोणतेही कारण नसताना वजन कमी होणे: अचानक आणि जलद गतीने वजन कमी होणे.
- कावीळ : त्वचा आणि डोळे पिवळे दिसणे.
- भूकमध्ये अचानक घट होणे: नेहमीपेक्षा कमी भूक लागणे.
- अचानक साखर वाढणे किंवा मधुमेह होणे: मधुमेह नसताना अचानक शुगर वाढणे.
- सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे: नेहमीच खूप थकल्यासारखे वाटणे.
उपचार आणि बचावाचे मार्ग
शस्त्रक्रिया : कर्करोग पसरला नसल्यास, सुरुवातीच्या टप्प्यात शस्त्रक्रिया सर्वात प्रभावी ठरते.
केमोथेरपी/रेडिएशन थेरपी: कर्करोगाला नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रिकव्हरीसाठी मदत करते.
इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी: ही आधुनिक उपचार पद्धती रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि केवळ कर्करोगाच्या पेशींवर लक्ष्य साधते.
बचावाचे उपाय
- वजन नियंत्रित ठेवा आणि शारीरिकरित्या सक्रिय रहा.
- धूम्रपान आणि मद्यपानाचे सेवन पूर्णपणे टाळा.
- लो-फॅट असलेला आणि संतुलित आहार घ्या.
- क्रॉनिक पॅन्क्रियाटायटिस असल्यास नियमित तपासणी करा.
- कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असल्यास नियमित स्क्रीनिंग करा.
हेही वाचा : आ Side effects of olive oil: जास्त ऑलिव्ह ऑइल खाल्ल्याने आरोग्याला पोहोचेल हानी; जाणून घ्या तोटे












Click it and Unblock the Notifications